गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                                   श्री                        ३8
 राजेश्वरीला अकस्मात आपल्या पुढे बघून महाराज चांगलेच दचकले होते,ही त्यांची खाजगी बाग होती इथे त्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश नव्हता पण राजेश्वरी त्यांच्या पुढ्यात उभी होती. 
             

           

 तिथल्या हिरवळीकडे राजेश्वरी एकाग्र होऊन बघत होती.महाराज तिला विचारत होते की तू इथे कशी काय आलीस त्यावर राजेश्वरीने काहीही न लपवता तिने जे काय बघितले ते सगळे महाराजांना सांगितले. सौधाजवळच्या पायरी पासून ते भुयारातून या बागे पर्यंत असे इथंभूत वर्णन राजेश्वरीने केले.तिच्या धाडसाचे महाराजांना खूप कौतुक वाटले पण तिच्या आगावूपणाचा राग पण आला.राजेश्वरीने त्यांना सांगितले की सर्वसामान्य माणसांना भुताची भीती दाखवून कित्येक लोक त्याचा गैरफायदा घेतात,अश्या लोकांपासून  भोळ्या भाबड्या लोकांना वाचवावे फक्त एव्हढाच हेतू या मागे होता.राज घराण्याच्या कोणत्याही रहस्याचा उलगडा करण्यात तिला किंवा तिच्या बापूला काडीमात्र रस नाही आणी तरीही जर महाराजांना यात काही गैर वाटत असेल तर ते सांगतील ती शिक्षा भोगायला राजेश्वरी आनंदाने तयार आहे,फक्त आज तिला राजमहालात परत जाऊ द्यावे कारण सुजयराजांनी त्यांच्या मित्रांना मुद्दाम रघुनाथ अन राजेश्वरीची चित्रकला दाखविण्याचे कबूल केले आहे.महाराज थोड्या वेळ विचारात पडले,राजेश्वरीवर कितपत विश्वास ठेवावा याचा त्यांना अंदाज येत नव्हता,नाही म्हटले तरी राजेश्वरीला राजघराण्याची नको ती रहस्य कळली होती,महाराज विचारात पडलेले बघून राजेश्वरी पुन्हा म्हणाली की महाराज दोन तीन दिवस राहून आम्ही इथून निघून जाणार आहोत,या दोन तीन दिवसात मी कुणाशीही काही बोलणार नाही,एव्हढेच काय पण मी आयुष्यभर कुणाला काही सांगणार नाही,राजेश्वरीच्या आर्जवी स्वराने महाराज आश्वस्त झाल्यासारखे दिसले.त्यांनी तिला तडक राजमहालाकडे जायला सांगितले.मुख्य रस्त्याने न जाता राजेश्वरीने एका आडवाटेने जाणे पसंत केले,अर्थात ही वाट तिला महाराजांनीच दाखविली होती. त्या वाटेनी राजेश्वरीचा पुन्हा एकदा राजमहालाकडे प्रवास सुरु झाला. पाय दुखत होते अन भूक लागली होती लवकरात लवकर राजमहाल गाठायला हवा.
                           सौ.उषा. 
                       



usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ३७ राजेश्वरी आता अंधाराला सरावली ह...

किल्ल्याचे रहस्य

                                                  श्री                                                  ३७
राजेश्वरी आता अंधाराला सरावली होती,अर्थात पुढे जाण्या वाचून तिच्याकडे दुसरा काही पर्याय शिल्लक नव्हता पण मुळात स्वभाव धीट असल्यामुळे कुठल्याही कठीण प्रसंगात तिचे सर्व बुद्धी चातुर्य पणाला लागत असे. अचानक राजेश्वरीला गार वाऱ्याची झुळूक आल्या सारखे वाटले म्हणजे जवळ बहुदा पाणी असावे.नदी,तलाव काहीच कल्पना नाही,पण आता आणखीच जपून चालायला हवे,राजेश्वरीने स्वतःलाच बजावले.तिचा अंदाज अगदी बरोबर होता.थोड्याच वेळात ती एका सुंदर जलाशया जवळ येऊन पोचली.त्यातले नितळ पाणी,सभोवतीचे तितकेच आकर्षक वातावरण या सगळ्याचाच थकलेल्या राजेश्वरीवर विलक्षण प्रभाव पडला.पहाटेच्या सूर्य किरणांनी हलकेच पदन्यास सुरु केला होता.सगळे वातावरण एका दैवी आनंदात मश्गुल झाल्यासारखे होते.जलाशयाच्या जवळ एक बाग दिसत होती.राजेश्वरीने पहिले त्या पाण्यात हात धुवून ओंजळीने पाणी पिऊन घेतले,पाणी प्यायल्यावर तिला खरोखर खूप बरे वाटले.आता तिने बागेकडे आपला मोर्चा वळवला.बागेत खूप विविध प्रकारची फुलं होती. कर्दळी,कण्हेर, गुलाब मोगरा,जाई-जुई, चमेली,कुंद,केवडा, कृष्णकमळ, शेवंती,झेंडू आणी असंख्य फुल झाडं त्या बागेत मोठ्या दिमाखात उभी होती.ही बाग जर सुजय राजांची असेल तर त्यांना जाब विचारायला हवा.आम्ही बापलेक जंगलात फुलांच्या साठी दिवसचे दिवस भटकत होतो,जरी जंगलात मुबलक फुलं असली तरी इथे साक्षात फुलबाग असताना आम्ही तंगडतोड करण्याची कुठलीच गरज नव्हती.पोटातल्या भुकेनी राजेश्वरीला विचारचक्रातून बाहेर काढले.काहीतरी खाल्ले  नाही तर आता नक्कीच चक्कर येऊन खाली पडू असे राजेश्वरीला वाटू लागले.बागेत एक पण फळझाड नव्हते,राजेश्वरीला बापूने शिकविलेले ज्ञान अश्यावेळेस कामास येई.तिने पटकन तुळशीची,कडूलिंबाची पाने,गुलाबाच्या,शेवंतीच्या पाकळ्या,अन कोवळ्या दुर्वा तोडून खायला सुरवात केली.एकीकडे डोक्यात विचार सुरु होते.बापू बिचारा आपली वाट पहात असेल.काय सांगितले असेल त्याने आपल्या न येण्याचे कारण ?आता विचार करून काहीच उपयोग नाही इथून कसेही करून राजमहालात परतायला हवे.ही बाग कितीही चांगली असली तरीही इथे फार काळ थांबणे धोक्याचेच आहे.
                   राजेश्वरी बागेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असताना तिला लांबवर कुणी माणसं आपसात बोलत येत असताना दिसली,राजेश्वरी पटकन एका दाट झुडुपात दडली.बोलणारी माणसं आता दृष्टीच्या टप्प्यात आली होती.महाराज सुदर्शन,महाराणी सुलक्षणा,अन राजकन्या सुवर्णरेखा,त्यांच्या सेवकांबरोबर बागेत आले होते.त्यांच्या सकाळच्या न्याहारीची व्यवस्था त्यांनी इथेच करायला सांगितले होते.राजेश्वरीच्या आनंदाला पारावर राहिला नाही.म्हणजे आपण कुठल्याच संकटात नाही आपण फक्त सुंदरपुरात येऊन पोचलो आहो.राजपरिवार न्याहारी करत असताना त्या अन्न पदार्थांच्या सुवासाने राजेश्वरीची भूक चांगलीच खवळली होती,पण स्वतःला सावरणे भाग होते अश्या अवस्थेत राजेश्वरी जवळ जवळ दोन तास बसली होती.आणखी फार काळ एक तर तिला बसणं शक्य नव्हतं,अन लपणं त्याहून कठीण! महाराणी सुलक्षणा अन सुवर्णरेखा उठून जाताना दिसल्यावर राजेश्वरी मनाशी काही विचार करून जरा वेळाने महाराज सुदर्शन बसले होते तिथे त्यांच्या पुढे जाऊन उभी राह्यली 
                                                            सौ.उषा. 

बुधवार, २१ डिसेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ३६ शेवटी ती वे...

किल्ल्याचे रहस्य

                                                  श्री                                            ३६
                          शेवटी ती वेळ येऊन ठेपली.माखन घाई घाईने रघुनाथला बोलवायला आला.रघुनाथ रंगाचे सगळे साहित्य घेऊन,वरकरणी निर्विकार मुद्रा ठेऊन माखनच्या पाठोपाठ निघाला.रघुनाथ इतका काळजीत होता की सुजयराजांनी दिलेले नवे कपडे अंगावर चढवायचे सुद्धा विसरला.
                         जुन्या मळक्या कपड्यातल्या रघुनाथला बघून सुजयराजे खरतर रागावले होते,मोठ्या कष्टाने आपला राग आवरून त्यांनी आपल्या मित्रांची अन रघुनाथची ओळख करून दिली,राजेश्वरीला खूप ताप भरला आहे हे कळल्यावर सगळ्यांनीच रघुनाथला परत जायला सांगितले. राजेश्वरीला बरे वाटल्यावर त्या दोघांनी चित्र काढावे असे सर्वानुमते ठरले. रघुनाथला एकदम हायसे वाटले.आजचे मरण उद्यावर टळले होते,पण राजेश्वरी कसेही करून परत यायला हवी,तिला शोधायचे तरी कुठे?अन या विषयावर बोलायचे तरी कोणाजवळ?एका ठिकाणी काम करत असताना एक रहस्यमय राजवाडा रघुनाथने रंगविला होता.त्या राजवाड्यात कधीच कुणी राह्यला जाणार नव्हते अन तरी त्याची बडदास्त उत्तम प्रकारे ठेवली होती.राजेश्वरीचा जन्म तिथलाच, रघुनाथला आज सगळं आठवत होतं, राजेश्वरीचा जन्म झाला त्याच दिवशी तिथल्या राजकन्येचा पण जन्म झाला,राजज्योतिषाच्या सांगण्यावरून तिचे रा अक्षरावरून राधिका असे नामकरण करण्यात आले होते,राजघराण्यात राजेश्वरी नाव कुणाला फार आवडले नव्हते,रंगकाम करणाऱ्या रघुनाथला मात्र आपल्या नूतन बालिके करता हे नाव फार फार आवडले.त्याने तडक घरी आल्यावर मुलीचे राजेश्वरी असे नामकरण करून देवापुढे साखर ठेवली होती.हे सगळं आपल्याला आज का आठवतं आहे?रघुनाथचे डोळे सारखे भरून येत होते.
                      आपण बसून काय राह्यलो ?रघुनाथने घाईघाईने काठी हातात घेतली अन जंगलाकडे मोर्चा वळवला.दिवसा इछ्या असूनही सौधाच्या दिशेनी जाता येत नव्हते.त्या वाड्या सारखीच रहस्य या राजमहालात पण दडली असतील ?अन त्या रहस्याचाच एक भाग  होऊन राहणार की काय आपली मुलगी?रघुनाथने जोरात नाही अशी मान हलवली.जंगलातल्या फुलांना बघून एरवी रघुनाथ प्रसन्न झाला असता, पण आज त्याचे कुठेच लक्ष लागत नव्हते.त्या रहस्यमय राजवाड्याचे अन या राजमहालाचे बरेच दुवे सारखे आहेत.राजेश्वरी कुठे आहेस ग तू? बाळ सुखरूप आहेस ना ?रघुनाथ वेड्यासारखा त्या वनात फिरत होता. साऱ्या आसमंतावर संध्याछाया पसरू लागल्या होत्या,पक्षी लगबगीने घरट्याकडे परतू लागले होते.रघुनाथच्या काळजीत काळोखाची भर पडली.तो जड पावलांनी राजमहालाकडे निघाला.
                                                                       सौ.उषा.