रविवार, २५ डिसेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                                श्री                                40          
राजेश्वरीला जाग आली तीच मुली सुजयराजांच्या आवाजाने.सुजयराजे रघुनाथला सांगत होते उद्या सकाळी ९ वाजता राजमहालाच्या भिंतीवर दोघांनी चित्र काढायचे आहे.येताना नवे कपडे घालून या अशी आठवण सुजय राजांनी करून दिली,रघुनाथने मान डोलावून होकार दिला. 
                    रात्री रघुनाथ जवळ जवळ जागाच होता,ही मुलगी पुन्हा नाहीशी झाली तर काय.रात्र संपून दिवस उजाडला दोघही बापलेक आंघोळ करून तयार होऊन बसले,सध्या त्यांनी त्यांचे रोजचेच कपडे घातले होते.अगदी जाताना नवे कपडे घालू असे ठरले.काहीतरी खाऊन घ्यावे म्हणून  दोघं विचारात असतानाच एक स्त्री त्यांच्या खोलीकडे येताना दिसली.ती जवळ आल्यावर राजेश्वरीच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही ती केशर होती.राजेश्वरी एकदम उठून उभी राह्यली तू? इथे?केशर हसत हसत आत आली अन म्हणाली  आता जास्त बोलायला वेळ नाही तुला व्यवस्थित तयार करून आणायला मला सांगितले आहे . हे बघ मी काही सामान पण आणले आहे.राजेश्वरी म्हणाली मी अंघोळ करून तयारच आहे फक्त कपडे बदलले की झाले.केशर यावर मस्त हसली,तिने राजेश्वरीला तिच्या पुढे बसण्यास सांगितले,थोड्या नाराजीने राजेश्वरी तयार झाली.अर्ध्या तासात केशरने तिच्या केसांना तेल लावून सुंदर केश रचना केली,अन तिला सुजयराजांनी दिलेले नवे कपडे घालायला सांगितले.कपडे घातल्यावर तिने राजेश्वरीला ओढत आरश्याच्या खोलीत नेऊन आरश्या समोर उभे केले.आरश्यातल्या राजेश्वरीला बघून राजेश्वरी थक्क झाली किती सुंदर दिसत होती ती!केसांना तेलाची तकाकी,त्यांची विलोभनीय रचना अन गुलाबी रंगाच्या कपड्यात खरोखरच तिचा कायापालट झाला होता.रघुनाथ पण आपल्या मुलीचे हे नवे रूप बघून स्तिमित झाला होता.केशरनी तिला हळूच आठवण करून दिली राजमहालात जायची वेळ झाली होती.तिचे वाक्य संपता संपता माखन बोलवायला आला.रघुनाथ पण आज नवे कपडे घालून तयार होता,त्यांचे रंगाचे साहित्य,माखन आणी दुसरे काही सेवक आणणार होते त्यामुळे रघुनाथ अन राजेश्वरी दोघही त्या राजमहालाकडे निघाले.
                       राजमहालाच्या प्रवेश द्वारावर उभ्या असलेल्या सेवकांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या करता असलेल्या मंचावर त्यांना बसायला सांगितले.ठरलेल्या वेळेच्या थोड्या आधीच दोघही बापलेक हजर असलेले बघून सुजयराजे खूष झाले.राजेश्वरीचे मनमोहक रूप आज सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होते.सुजयराजे स्वतःला मोठ्या कष्टाने आवरत होते.तिच्याकडे बघण्याचा अनावर मोह मनाला होऊनही त्यानी स्वतःला संयमाने बांधून ठेवले होते.सुजयराजांची सगळी मित्र मंडळी जमल्यावर सुजयराजांनी राजेश्वरीची सगळ्यांना ओळख करून दिली. आधी थोडे खाऊन मग त्या दोघांनी चित्र काढावे असे ठरले.
                 रघुनाथ अन राजेश्वरी दोघही अतिशय संकोचले होते. ह्या आधी त्यांना इतके बरोबरीच्या नात्याने कुणीच वागवले नव्हते अन त्यांचीही तशी अपेक्षा नव्हती.सुजयराजांच्या व्यक्तिमत्वाने दोघही खूपच प्रभावित झाले होते.राजेश्वरीच्या इच्छेविरुद्ध सुजयराजांचे चित्र तिच्या मनःपटलावर कोरले गेले होते.ते पुसण्याचा निष्फळ प्रयत्न राजेश्वरीने चालवला होता,कारण ती कुठल्याच दृष्टीने त्यांच्या योग्य नव्हती,सगळ्यात मुख्य ते विवाहित होते,राणी सुकन्या जिवंत होती,हे राजेश्वरीने स्वतःच्या डोळ्याने पहिले होते.काय करावे ?या मनाला कसे समजवावे ?डोळ्यात जमा झालेले पाणी राजेश्वरीने हलकेच निपटून टाकले.एकदा हे चित्राचे काम झाले की आपण येथून निघून जाणार आहो मग सुजय राजे आपल्याला दिसणार नाही,त्यांच्याशी तसाही आपला काही संबध नाही असे स्वतःला बजावत राजेश्वरी चित्र काढण्याकरता सज्ज झाली.
                                     सौ.उषा  

शनिवार, २४ डिसेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                      श्री                     ३९ 

राजेश्वरी स्वतःशीच गुणगुणत चालली होती.आता तिला कसलीही भीती वाटत नव्हती वाटेत दिसणारी असंख्य फुलझाडं तिला खुणावत होती.निर्मनुष्य रस्त्यावरून रमत गमत राजेश्वरी चालली होती,घोड्याच्या टापांचा आवाज ऐकून तिने आपले तोंड झाकून चालायला सुरुवात केली,पण तिचा वेश सगळ्या सुंदरपुरला चांगलाच माहीत झाला होता त्यामुळे तिने जरी तोंड झाकले असले तरी ती स्वतःची ओळख मात्र लपवू शकली नाही.पांढऱ्या रंगाची सुंदर फुलं रस्त्याच्या दुतर्फा लागली होती यांच्या कडे आपले आता पर्यंत लक्ष कसे गेले नाही याचेच राजेश्वरीला आश्चर्य वाटत होत
 


तिच्या स्वतःच्याच लक्षात आले की या वाटेने आपण आज पहिल्यांदाच जातो आहो.टापांचा आवाज आता अगदी जवळ आल्यासारखे वाटले,लपायला जागा नव्हती,शेवटी खाली मान घालून निघून जायचे ठरवून राजेश्वरीने पावलांना वेग दिला.तिच्या अगदी जवळ घोडा थांबला,माखन घोड्यावरून खाली उतरला.राजेश्वरी तू इथे काय करतेस ?तुला खूप ताप भरला म्हणून मी आताच औषध पण देऊन आलो रघुनाथ जवळ ,त्याच्या प्रश्नांच्या भडीमारातून स्वतःला कसेबसे सावरत राजेश्वरी म्हणाली आता मला बरे वाटते आहे म्हणून मी थोडं मोकळ्या हवेत फिरायला बाहेर पडले.विचित्र आहे अश्या अर्थी मान झटकून माखन पुढे निघून गेला,पण ही पायवाट त्यातूनही आडवाट राजेश्वरीला कशी माहीत झाली ह्याचा त्याला काही केल्या उलगडा होईना,पण त्याला अजून पुष्कळ कामं असल्यामुळे या प्रश्नाच्या खोलात जायला त्याला वेळ नव्हता. 

                            राजेश्वरीला राजमहाल दिसू लागला होता,ही बहुतेक राजवाड्याची मागची बाजू असावी कारण या रस्त्याने ती यापूर्वी आली नव्हती राजमहालात येऊन पोचली तेव्हा दुपार झाली होती. राजेश्वरीने आपल्या खोलीत प्रवेश केला,तिला बघून रघुनाथ एकदम उठून उभा राह्यला,तिला पोटाशी धरून एखाद्या लहान मुला प्रमाणे तो रडत होता.राजेश्वरीलाही रडू येत होते.राजेश्वरीला समोर बसवून रघुनाथने तिला चार गोष्टी सांगितल्या अन आता कुठलेही रहस्य उलगडण्याच्या फंदात राजेश्वरीने पडू नये हे त्याने पुन्हा बजावून सांगितले.उद्या सकाळी कुठलेही कारण सांगता त्या दोघांनी सुजयराजांच्या मित्रांना चित्रकला दाखवून दुपारी किंवा जास्तच जास्त संध्याकाळी इथून निघून जायचे असे ठरल्यावर रघुनाथने राजेश्वरी समोर त्याचे सकाळचे जेवणाचे ताट ठेवले,राजेश्वरी प्रमाणेच रघुनाथ पण उपाशी होता.त्याच ताटात दोघही बापलेक जेवले.अन जेवण झाल्यावर राजेश्वरी लगेच झोपून गेली.   

                                        

                                                                                       सौ.उषा.

                                                 

   












गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                                   श्री                        ३8
 राजेश्वरीला अकस्मात आपल्या पुढे बघून महाराज चांगलेच दचकले होते,ही त्यांची खाजगी बाग होती इथे त्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश नव्हता पण राजेश्वरी त्यांच्या पुढ्यात उभी होती. 
             

           

 तिथल्या हिरवळीकडे राजेश्वरी एकाग्र होऊन बघत होती.महाराज तिला विचारत होते की तू इथे कशी काय आलीस त्यावर राजेश्वरीने काहीही न लपवता तिने जे काय बघितले ते सगळे महाराजांना सांगितले. सौधाजवळच्या पायरी पासून ते भुयारातून या बागे पर्यंत असे इथंभूत वर्णन राजेश्वरीने केले.तिच्या धाडसाचे महाराजांना खूप कौतुक वाटले पण तिच्या आगावूपणाचा राग पण आला.राजेश्वरीने त्यांना सांगितले की सर्वसामान्य माणसांना भुताची भीती दाखवून कित्येक लोक त्याचा गैरफायदा घेतात,अश्या लोकांपासून  भोळ्या भाबड्या लोकांना वाचवावे फक्त एव्हढाच हेतू या मागे होता.राज घराण्याच्या कोणत्याही रहस्याचा उलगडा करण्यात तिला किंवा तिच्या बापूला काडीमात्र रस नाही आणी तरीही जर महाराजांना यात काही गैर वाटत असेल तर ते सांगतील ती शिक्षा भोगायला राजेश्वरी आनंदाने तयार आहे,फक्त आज तिला राजमहालात परत जाऊ द्यावे कारण सुजयराजांनी त्यांच्या मित्रांना मुद्दाम रघुनाथ अन राजेश्वरीची चित्रकला दाखविण्याचे कबूल केले आहे.महाराज थोड्या वेळ विचारात पडले,राजेश्वरीवर कितपत विश्वास ठेवावा याचा त्यांना अंदाज येत नव्हता,नाही म्हटले तरी राजेश्वरीला राजघराण्याची नको ती रहस्य कळली होती,महाराज विचारात पडलेले बघून राजेश्वरी पुन्हा म्हणाली की महाराज दोन तीन दिवस राहून आम्ही इथून निघून जाणार आहोत,या दोन तीन दिवसात मी कुणाशीही काही बोलणार नाही,एव्हढेच काय पण मी आयुष्यभर कुणाला काही सांगणार नाही,राजेश्वरीच्या आर्जवी स्वराने महाराज आश्वस्त झाल्यासारखे दिसले.त्यांनी तिला तडक राजमहालाकडे जायला सांगितले.मुख्य रस्त्याने न जाता राजेश्वरीने एका आडवाटेने जाणे पसंत केले,अर्थात ही वाट तिला महाराजांनीच दाखविली होती. त्या वाटेनी राजेश्वरीचा पुन्हा एकदा राजमहालाकडे प्रवास सुरु झाला. पाय दुखत होते अन भूक लागली होती लवकरात लवकर राजमहाल गाठायला हवा.
                           सौ.उषा. 
                       



usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ३७ राजेश्वरी आता अंधाराला सरावली ह...

किल्ल्याचे रहस्य

                                                  श्री                                                  ३७
राजेश्वरी आता अंधाराला सरावली होती,अर्थात पुढे जाण्या वाचून तिच्याकडे दुसरा काही पर्याय शिल्लक नव्हता पण मुळात स्वभाव धीट असल्यामुळे कुठल्याही कठीण प्रसंगात तिचे सर्व बुद्धी चातुर्य पणाला लागत असे. अचानक राजेश्वरीला गार वाऱ्याची झुळूक आल्या सारखे वाटले म्हणजे जवळ बहुदा पाणी असावे.नदी,तलाव काहीच कल्पना नाही,पण आता आणखीच जपून चालायला हवे,राजेश्वरीने स्वतःलाच बजावले.तिचा अंदाज अगदी बरोबर होता.थोड्याच वेळात ती एका सुंदर जलाशया जवळ येऊन पोचली.त्यातले नितळ पाणी,सभोवतीचे तितकेच आकर्षक वातावरण या सगळ्याचाच थकलेल्या राजेश्वरीवर विलक्षण प्रभाव पडला.पहाटेच्या सूर्य किरणांनी हलकेच पदन्यास सुरु केला होता.सगळे वातावरण एका दैवी आनंदात मश्गुल झाल्यासारखे होते.जलाशयाच्या जवळ एक बाग दिसत होती.राजेश्वरीने पहिले त्या पाण्यात हात धुवून ओंजळीने पाणी पिऊन घेतले,पाणी प्यायल्यावर तिला खरोखर खूप बरे वाटले.आता तिने बागेकडे आपला मोर्चा वळवला.बागेत खूप विविध प्रकारची फुलं होती. कर्दळी,कण्हेर, गुलाब मोगरा,जाई-जुई, चमेली,कुंद,केवडा, कृष्णकमळ, शेवंती,झेंडू आणी असंख्य फुल झाडं त्या बागेत मोठ्या दिमाखात उभी होती.ही बाग जर सुजय राजांची असेल तर त्यांना जाब विचारायला हवा.आम्ही बापलेक जंगलात फुलांच्या साठी दिवसचे दिवस भटकत होतो,जरी जंगलात मुबलक फुलं असली तरी इथे साक्षात फुलबाग असताना आम्ही तंगडतोड करण्याची कुठलीच गरज नव्हती.पोटातल्या भुकेनी राजेश्वरीला विचारचक्रातून बाहेर काढले.काहीतरी खाल्ले  नाही तर आता नक्कीच चक्कर येऊन खाली पडू असे राजेश्वरीला वाटू लागले.बागेत एक पण फळझाड नव्हते,राजेश्वरीला बापूने शिकविलेले ज्ञान अश्यावेळेस कामास येई.तिने पटकन तुळशीची,कडूलिंबाची पाने,गुलाबाच्या,शेवंतीच्या पाकळ्या,अन कोवळ्या दुर्वा तोडून खायला सुरवात केली.एकीकडे डोक्यात विचार सुरु होते.बापू बिचारा आपली वाट पहात असेल.काय सांगितले असेल त्याने आपल्या न येण्याचे कारण ?आता विचार करून काहीच उपयोग नाही इथून कसेही करून राजमहालात परतायला हवे.ही बाग कितीही चांगली असली तरीही इथे फार काळ थांबणे धोक्याचेच आहे.
                   राजेश्वरी बागेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असताना तिला लांबवर कुणी माणसं आपसात बोलत येत असताना दिसली,राजेश्वरी पटकन एका दाट झुडुपात दडली.बोलणारी माणसं आता दृष्टीच्या टप्प्यात आली होती.महाराज सुदर्शन,महाराणी सुलक्षणा,अन राजकन्या सुवर्णरेखा,त्यांच्या सेवकांबरोबर बागेत आले होते.त्यांच्या सकाळच्या न्याहारीची व्यवस्था त्यांनी इथेच करायला सांगितले होते.राजेश्वरीच्या आनंदाला पारावर राहिला नाही.म्हणजे आपण कुठल्याच संकटात नाही आपण फक्त सुंदरपुरात येऊन पोचलो आहो.राजपरिवार न्याहारी करत असताना त्या अन्न पदार्थांच्या सुवासाने राजेश्वरीची भूक चांगलीच खवळली होती,पण स्वतःला सावरणे भाग होते अश्या अवस्थेत राजेश्वरी जवळ जवळ दोन तास बसली होती.आणखी फार काळ एक तर तिला बसणं शक्य नव्हतं,अन लपणं त्याहून कठीण! महाराणी सुलक्षणा अन सुवर्णरेखा उठून जाताना दिसल्यावर राजेश्वरी मनाशी काही विचार करून जरा वेळाने महाराज सुदर्शन बसले होते तिथे त्यांच्या पुढे जाऊन उभी राह्यली 
                                                            सौ.उषा.