रविवार, २९ जानेवारी, २०१२

किल्ल्याचे रहस्य

                                              श्री                                                    ५४
                        किल्ला दुरून दिसू लागला होता.आपले घर दिसल्या सारखा आनंद सगळ्यांना झाला.राजेश्वरी खोलीत आली आणी ती आश्चर्य चकित झाली एकाच दिवसात खोलीचा कायापालट झाला होता.खोलीत दोन पलंग त्यावर गाद्या सुंदर चादरी अन खोलीत पाय रुतेल इतका जाड गालीचा. रघुनाथ पण या बदलाने प्रभावित झाल्याशिवाय राह्यला नाही. त्याला फक्त एकाच काळजीने व्यापले होते की आपण आता झोपायचे कसे? इतक्या जाड गादीवर आजवर तो कधीच झोपला नव्हता. सुवर्णरेखेला मात्र या सगळ्यापेक्षा आपल्याला इथे राह्यला मिळणार अन जमलं तर त्या बाईला पुन्हा भेटायला मिळणार.माझ्या म्हाताऱ्या आजी आजोबांना,माझ्या बापूला फटके मारणाऱ्या, उपाशी ठेवणाऱ्या त्या बाईला काहीतरी जबरदस्त शिक्षा केली पाहिजे या विचारात ती दंग होती.राजेश्वरी फुलांच्या पायघड्यांवर जणू चालत होती.एकाच वेळेस सर्व रंग अवतरले होते .त्या रंगांचे कौतुक राजेश्वरी शिवाय कोण जाणू शकणार!
तिचा जन्मच मुळी रंगांशी खेळण्या करता झाला होता.
                      किल्ल्यावरची सगळी माणसं काहीतरी निमित्त साधून खोलीत डोकावून गेली होती.राजेश्वरी अन रघुनाथचे एका दिवसात पालटलेले भाग्य सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय होते.त्यात राजकन्येला त्यांच्या बरोबर राह्यची परवानगी हा तर रहस्यमय भाग होता.राजेश्वरीला मनातल्या मनात हसू येत होते.आपल्या अंगावर धड कपडे नाही अन या उंची गालिचे अन चादरीवर आपण वावरायचे छे!ही बहुदा राजकन्ये करता व्यवस्था केली असावी.आपणच रात्री दुसरी खोली गाठावी हेच बरे.तिची विचार शृंखला तुटली ती माखनच्या आवाजाने त्याने हातातले गाठोडे तिच्या स्वाधीन केले अन सांगितले की महाराणी म्हणाल्या की यापुढे हेच कपडे अन अलंकार घालायचे.त्याचे वाक्य जणु पूर्ण करण्या करता आत येत सुजयराजे म्हणाले तसेही तुझे वस्त्र वाघाशी लढताना फाटले,जळले आहे,तेव्हा आता नाही म्हणू नकोस आणी या सगळ्याचा स्वीकार कर. राजेश्वरी फक्त एवढेच म्हणाली की मला जर त्या ठिकाणी नोकर म्हणून जायचे असेल तर मला एवढे भारी कपडे अन अलंकार घालणे सोयीचे नाही.आपण या आधी दिलेले हे थोडे अलंकार मी रोज घालते,मला कपड्यांची आवश्यकता आहे पण ते साधे कपडे,त्यांची कृपया व्यवस्था करावी.आणी हो आपल्याला कसे कळले मी वाघाला पळवले,सुजयराजे हसत म्हणाले,आम्ही तुमच्या मागोमाग इकडे यायला निघालो.आम्ही संध्याकाळी येणार होतो पण मग विचार आला की तुझ्या शोध मोहिमेत मला पण भाग घ्यायला मिळाला तर तेवढाच आनंद मिळेल.
                                   राजेश्वरीच्या योजनेप्रमाणे रात्री सगळ्यांनी वागायचे नक्की झाले.रघुनाथ,सुजयराजे बरोबर येणार म्हणून एकीकडे तिला आनंद झाला होता अन त्याच वेळेस त्यांचे येणे त्यात सुवर्णरेखा बरोबर म्हणजे थोडी काळजी वाटत होती.याच योजनेचा भाग म्हणून सुजयराजे राजकन्येला घेऊन राजमहालात गेले.
                                सौ.उषा.
                       
                    




                                                                             

बुधवार, २५ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com:                                          श्री     ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...: श्री ५३ राजेश्वरी राजवाड्यातून बाहेर जायला निघाल्यावर महारा...
                                         श्री                                    ५३
राजेश्वरी राजवाड्यातून बाहेर जायला निघाल्यावर महाराज स्वतःच म्हणाले पायी जाऊ नका तुम्ही आमच्या सुजयराजांची वधू आहात सुजयराजे बाहेर त्यांच्या बरोबर आले आणी त्यांनी हळू आवाजात त्या दोघांना जास्त सावध राहण्याची सूचना केली.आणी आज संध्याकाळी आपण येईपर्यंत खोलीतून कुठेही न जाण्याची त्यांनी अप्रत्यक्ष सूचनाच केली.त्यांचे बोलणे सुरु होते तोच कुठूनतरी सुवर्णरेखा धावत आली आणी राजेश्वरी बरोबर जाण्याचा हट्ट करू लागली.शेवटी सुजयराजे तिला म्हणाले की आजी आजोबा हो म्हणाले तरच जायचं,राजकन्या पटकन आत धावत गेली अन येताना महाराज सुदर्शन अन महाराणी सुलक्षणाला बरोबर घेऊन आली त्यानी राजेश्वरीला राजकन्येची काळजी घ्यायला बजावून सांगितले.तिचा सेवक पण थोड्यावेळात तिच्याकरता खाण्याचे साहित्य अन काही कपडे घेऊन हजर झाला.रात्री उशीरा राजवाड्यावर परत यायचे नाही असे त्यानी सांगितल्यामुळेतर राजकन्येला फारच आनंद झाला.म्हणजे आज रात्री पण आपल्याला किल्य्यावर राह्यला मिळेल,राजेश्वरी बरोबर राह्यला मिळेल.सेवक घोड्यावर अन बाकी तिघं बैलगाडीतून निघाले.राजेश्वरीच मन पिसा सारखं हलकं झालं होतं.तिच्या बुद्धी आणी मनाचा मोठा अजब खेळ चालला होतं.बुद्धी सर्व तपासून घ्यायला सांगत होती,अन मन म्हणत होतं मला कुठल्याच प्रश्नांची उत्तर नको.मला सुजय राजांनी आपलं म्हंटल हेच माझ्या करता पुरेसे आहे.हातातल्या काठीशी एकीकडे तिचा खेळ सुरु होता.राजेश्वरी भानावर आली ती समोरच्या दृश्याने 
राजकन्या तर भीतीने थरथर कापू लागली.समोर मोठ्या डौलात बसलेल्या वाघोबांना बघून सगळेच घाबरले होते,बैल आधीच बुजले होते पण आपल्याच तालात असलेल्या राजेश्वरीच्या ते लक्षात आले नव्हते. रघुनाथ खाली उतरला अन म्हणाला तुम्ही माघारी जा मी एकटा या वाघाला थोपवून धरतो .राजेश्वरीने सपशेल नकार दिला,तिने पटकन अंगावरची ओढणी काढली गाडीवाना जवळून त्याची काड्यापेटी घेतली अन ओढणी पेटवून दिली,एका हातात पेटलेली ओढणी अन दुसऱ्या हातात काठी घेऊन ती सरळ वाघावर चालून गेली.वाघ जागचा उठून जंगलात पळाला.राजेश्वरीचे प्रसंगावधान बघून सगळेच आश्चर्यचकित झाले. उरलेलेला प्रवास निर्विघ्न पार पडला.साऱ्या रस्ताभर सुवर्णरेखा राजेश्वरीला  बिलगून बसली.राजेश्वरी अन रघुनाथ हाच विचार करत होते की आजवर जंगलात इतक्या वेळा जाऊन कधीही वाघ दिसला नाही. संकट थोडक्यात टळले होते.
                                सौ.उषा.

रविवार, २२ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ५२ सुजयराजे घोड्यावरून खाली उतरून त्या दोघांबरोबर पाय...

किल्ल्याचे रहस्य

                                            श्री                                 ५२
सुजयराजे घोड्यावरून खाली उतरून त्या दोघांबरोबर पायी चालत राजवाड्यात आले.सुदर्शन महाराज आणी महाराणी सुलक्षणा बसलेल्या कक्षात त्यानी राजेश्वरीसह प्रवेश केला.राजकन्या त्यांना बघून आनंदाने पुढे झेपावली.तिने सुजयराजांना बापू म्हणत घट्ट मिठी मारली.हा आनंद   सुजयराजांना अगदीच अनपेक्षित होता.गेल्या कित्येक वर्षात त्यांच्या लेकीने त्यांच्यावर अश्याप्रकारे प्रेमवर्षाव केला नव्हता.त्या दिवशी जंगलात थोडं वेगळे वागली होती पण ती तिची क्षणिक लहर म्हणून त्यांनी फार लक्ष दिले नव्हते,आजचा प्रकार काही वेगळाच होता.त्यांचे आई वडील पण हा प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले होते.राजांनी आपल्या लेकीला कडेवर उचलून तिचे खूप लाड केले.आणी मग एकदम भानावर आल्यासारखे त्यांनी तिला खाली उतरवले.राजकन्या थोडी नाराज झाली कारण तिला तिच्या वडलांना खूप काहीतरी सांगायचे होते,ती फक्त इतकेच म्हणाली "माझे बापू जगातले सगळ्यात चांगले बापू आहेत."सुजयराजांच्या डोळ्यात पाणी तरळले, राजकन्या बाहेर खेळायला निघून गेली.
                               सुजयराजांनी आता राजेश्वरीचा हात धरून तिला महाराज अन महाराणी पुढे उभे केले,अन ते म्हणाले की तुम्हीच आमच्या मागे लागला होता दुसरे लग्न कर म्हणून,आम्ही हिला आपला जीवनाचा जोडीदार म्हणून निवडले आहे,तिच्या काही प्रश्नांची उत्तरं ती शोधते आहे आणी म्हणून आम्ही ह्या दोघांना इथे राहण्याची कुठेही फिरण्याची अनुमती दिली आहे.आपणास पसंत नसेल तर आम्ही आयुष्यभर असेच राहू पण आम्हाला पुन्हा दुसरा विवाह करण्यास सांगू नये.राजांच्या स्पष्ट बोलण्याने थोड्यावेळ त्यांचे आईवडील पण चकित झाले,इकडे राजेश्वरी उभ्या जागी थरथर कापत होती राजांनी आपल्या हातातला तिचा हात दाबून तिला आश्वस्त केले.महाराज सुदर्शन म्हणाले की कुणामुळे का होईना तुम्ही विवाहास तयार झाला हेच आम्हाला विशेष वाटते पण एका राजकुमाराने एकदम रंगारी मुलीशी,न शिकलेल्या मुलीशी विवाह करण्याचा अट्टाहास धरावा हेच आम्हाला विचित्र वाटते.राजघराण्यातल्या एकापेक्षा एक उत्तम मुलींची स्थळ तुमच्याकरता खोलंबून आहेत. सुजयराजे पुन्हा त्यांच्या नम्र आवाजात म्हणाले "महाराज मला क्षमा करा पण येणाऱ्या काळात ह्या सगळ्याच संकल्पना पार इतिहासात जमा होणार आहेत.आपण कित्येक वर्षात सुंदरपुरातून बाहेर पडला नाही त्यामुळे बाहेरच्या बदलांची आपल्याला काहीच गंधवार्ता नाही.येत्या काही वर्षात राजे राण्या हे फक्त कथा कल्पनातच असणार आहेत. आम्हाला नव्या काळाची चाहूल फार पूर्वीच लागली हे आम्ही आमचे भाग्य समजतो,पण राजेश्वरीचे राजघराणे नसणे हे माझ्या दृष्टीने फारसे महत्वाचे नाही आणी शिक्षण म्हणाल तर ती अजून लहान आहे,नव्या गोष्टी शिकायची तिला आवड आहे हे नाझ्या मते पुरेसे आहे.ती एक चांगली व्यक्ती आहे हे महाराज मला जास्त महत्वाचे वाटते."आता मात्र महाराणी सुलक्षणा बोलायला सरसावल्या "तुम्ही हिला लग्नाची मागणी घातली हे आम्हाला सांगितले नाही,त्यातही ही मुलगी आता कोणत्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहे हेच आम्हाला कळत नाही,तुमच्या सारखा नवरा हिला शोधूनतरी सापडला असता का?माझ्या मते ही तुमचा सरळ सरळ अपमान करते आहे."राजेश्वरी नाही अशी मान हलवून थांबली पण सुजयराजेच म्हणाले "आई हा तिच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे,तिला जर सुकन्या बद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर तिला निशितच तो अधिकार दिला पाहिजे"सुजयराजांच्या बोलण्यामुळे राजेश्वरी इतकी प्रभावित झाली की ती भान हरपून त्यांच्या कडे बघतच राह्यली.ती भानावर आली तीच महाराज सुदर्शन ह्यांनी मारलेल्या सूनबाई ह्या हाकेने.राजेश्वरीच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राह्यले अन इतक्यावेळ पुतळ्या सारखा उभा असलेला रघुनाथ डोळ्यातल्या पाण्याला   अडवायचा  निरर्थक प्रयत्न करू लागला.महाराज म्हणत होते "सूनबाई काय प्रश्न असतील त्यांची पटापट उत्तरं शोधा आणी लवकर आमच्या बरोबर राह्यला या हा राजवाडा तुमच्या स्वागताला आतुर झाला आहे".  
                                                  सौ.उषा.      

गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com:                                           श्री    ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...: श्री ५१ राजकन्ये बरोबर राजवाड्यावर जायला निघालेल्या राजेश...
                                          श्री                                     ५१
 राजकन्ये बरोबर राजवाड्यावर जायला निघालेल्या राजेश्वरी बरोबर रघुनाथ पण निघाला तो आता तिला एकटे जाऊ द्यायला तयार नव्हता. राजेश्वरीने परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण रघुनाथ काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता,शेवटी त्या दोघी घोड्यावर अन रघुनाथ अन राजकन्येचा सेवक पायी असे राजवाड्याकडे जायला निघाले. दोघ पायी चालत असल्याने घोड्याची गती पण मंद होती.त्यात जंगलातली वाट. 
                              रात्री उशीरा आलेल्या सुवर्णरेखेला बघून महाराज सुदर्शन चांगलेच रागावले होते.त्यात तिच्या बरोबर रघुनाथ अन राजेश्वरीला बघून तर ते फारच चिडले.रघुनाथ अन त्याच्या मुलीचे इथले काम आटोपले होते आता त्यांनी इथून निघून जावे असे त्यांना मनापासून वाटत होते.ते इथून गेल्याशिवाय राजकन्या किल्ल्यावर जाणे बंद करणार नाही हे त्यांना स्पष्ट दिसत होते.स्वतःचा राग आवरून त्यांनी रघुनाथ अन राजेश्वरीला नोकरांच्या निवासस्थानात आजची रात्र काढायला परवानगी दिली मात्र त्यानी सकाळी उजाडता किल्य्यावर निघून जावे अशी सूचना त्यांनी केली.
                       रात्र कशीबशी काढून सकाळी दोघही पायीच किल्य्याकडे निघाले.वाटेत रस्त्याच्या कडेला असलेल्याला फुलझाडाचे एक मोठे फुल राजेश्वरीने तोडून घेतले अन त्याची दांडी धरून फिरवत ती पुढे निघाली.पायी चालत जाण्याचे त्या दोघांना काहीच वाटत नव्हते पण महाराज ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागले त्याने दोघही नाराज होते.रात्री त्यांना कुणी जेवायला पण विचारले नाही.मनाच्या अश्या अवस्थेत अकस्मात समोर सुजयराजे अन माखनला बघून सगळेच एकमेकाकडे आश्चर्याने बघू लागले.राजेश्वरीचे प्रसन्न दर्शन सुजयराजांना खूपच सुखावून गेले.आणी ते तिच्याकडे बघतच राह्यले.

           त्यांच्या अश्या बघण्याने राजेश्वरी चांगलीच अस्वस्थ झाली होती.नजर खाली ठेउनच तिने थोडक्यात त्यांना इथे राजवाड्यात येण्याचे प्रयोजन सांगितले.राजकन्येला पण आपल्या सारखीच राजेश्वरी आवडू लागली असल्याचे कळल्यामुळे तर ते फारच खूष झाले.त्यांनी त्या दोघांना आपल्या बरोबर ताबडतोब राजवाड्यावर चालण्याचा आग्रह केला तेव्हा नाईलाजाने रघुनाथने त्यांना आमच्या दोघांचे येणे महाराजांना आवडले नसल्याचे सांगितले.हे ऐकल्यावरतर सुजयराजे हट्टालाच पेटले,ते काहीही ऐकून घ्यायला तयार होईना.शेवटी काय होईल ते होईल आजच सगळ्याचा सोक्षमोक्ष लागलेला बरा असे ठरवून रघुनाथ राजेश्वरीला घेऊन माघारी वळला.    
                                           सौ.उषा.