रविवार, २२ जानेवारी, २०१२

किल्ल्याचे रहस्य

                                            श्री                                 ५२
सुजयराजे घोड्यावरून खाली उतरून त्या दोघांबरोबर पायी चालत राजवाड्यात आले.सुदर्शन महाराज आणी महाराणी सुलक्षणा बसलेल्या कक्षात त्यानी राजेश्वरीसह प्रवेश केला.राजकन्या त्यांना बघून आनंदाने पुढे झेपावली.तिने सुजयराजांना बापू म्हणत घट्ट मिठी मारली.हा आनंद   सुजयराजांना अगदीच अनपेक्षित होता.गेल्या कित्येक वर्षात त्यांच्या लेकीने त्यांच्यावर अश्याप्रकारे प्रेमवर्षाव केला नव्हता.त्या दिवशी जंगलात थोडं वेगळे वागली होती पण ती तिची क्षणिक लहर म्हणून त्यांनी फार लक्ष दिले नव्हते,आजचा प्रकार काही वेगळाच होता.त्यांचे आई वडील पण हा प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले होते.राजांनी आपल्या लेकीला कडेवर उचलून तिचे खूप लाड केले.आणी मग एकदम भानावर आल्यासारखे त्यांनी तिला खाली उतरवले.राजकन्या थोडी नाराज झाली कारण तिला तिच्या वडलांना खूप काहीतरी सांगायचे होते,ती फक्त इतकेच म्हणाली "माझे बापू जगातले सगळ्यात चांगले बापू आहेत."सुजयराजांच्या डोळ्यात पाणी तरळले, राजकन्या बाहेर खेळायला निघून गेली.
                               सुजयराजांनी आता राजेश्वरीचा हात धरून तिला महाराज अन महाराणी पुढे उभे केले,अन ते म्हणाले की तुम्हीच आमच्या मागे लागला होता दुसरे लग्न कर म्हणून,आम्ही हिला आपला जीवनाचा जोडीदार म्हणून निवडले आहे,तिच्या काही प्रश्नांची उत्तरं ती शोधते आहे आणी म्हणून आम्ही ह्या दोघांना इथे राहण्याची कुठेही फिरण्याची अनुमती दिली आहे.आपणास पसंत नसेल तर आम्ही आयुष्यभर असेच राहू पण आम्हाला पुन्हा दुसरा विवाह करण्यास सांगू नये.राजांच्या स्पष्ट बोलण्याने थोड्यावेळ त्यांचे आईवडील पण चकित झाले,इकडे राजेश्वरी उभ्या जागी थरथर कापत होती राजांनी आपल्या हातातला तिचा हात दाबून तिला आश्वस्त केले.महाराज सुदर्शन म्हणाले की कुणामुळे का होईना तुम्ही विवाहास तयार झाला हेच आम्हाला विशेष वाटते पण एका राजकुमाराने एकदम रंगारी मुलीशी,न शिकलेल्या मुलीशी विवाह करण्याचा अट्टाहास धरावा हेच आम्हाला विचित्र वाटते.राजघराण्यातल्या एकापेक्षा एक उत्तम मुलींची स्थळ तुमच्याकरता खोलंबून आहेत. सुजयराजे पुन्हा त्यांच्या नम्र आवाजात म्हणाले "महाराज मला क्षमा करा पण येणाऱ्या काळात ह्या सगळ्याच संकल्पना पार इतिहासात जमा होणार आहेत.आपण कित्येक वर्षात सुंदरपुरातून बाहेर पडला नाही त्यामुळे बाहेरच्या बदलांची आपल्याला काहीच गंधवार्ता नाही.येत्या काही वर्षात राजे राण्या हे फक्त कथा कल्पनातच असणार आहेत. आम्हाला नव्या काळाची चाहूल फार पूर्वीच लागली हे आम्ही आमचे भाग्य समजतो,पण राजेश्वरीचे राजघराणे नसणे हे माझ्या दृष्टीने फारसे महत्वाचे नाही आणी शिक्षण म्हणाल तर ती अजून लहान आहे,नव्या गोष्टी शिकायची तिला आवड आहे हे नाझ्या मते पुरेसे आहे.ती एक चांगली व्यक्ती आहे हे महाराज मला जास्त महत्वाचे वाटते."आता मात्र महाराणी सुलक्षणा बोलायला सरसावल्या "तुम्ही हिला लग्नाची मागणी घातली हे आम्हाला सांगितले नाही,त्यातही ही मुलगी आता कोणत्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहे हेच आम्हाला कळत नाही,तुमच्या सारखा नवरा हिला शोधूनतरी सापडला असता का?माझ्या मते ही तुमचा सरळ सरळ अपमान करते आहे."राजेश्वरी नाही अशी मान हलवून थांबली पण सुजयराजेच म्हणाले "आई हा तिच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे,तिला जर सुकन्या बद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर तिला निशितच तो अधिकार दिला पाहिजे"सुजयराजांच्या बोलण्यामुळे राजेश्वरी इतकी प्रभावित झाली की ती भान हरपून त्यांच्या कडे बघतच राह्यली.ती भानावर आली तीच महाराज सुदर्शन ह्यांनी मारलेल्या सूनबाई ह्या हाकेने.राजेश्वरीच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राह्यले अन इतक्यावेळ पुतळ्या सारखा उभा असलेला रघुनाथ डोळ्यातल्या पाण्याला   अडवायचा  निरर्थक प्रयत्न करू लागला.महाराज म्हणत होते "सूनबाई काय प्रश्न असतील त्यांची पटापट उत्तरं शोधा आणी लवकर आमच्या बरोबर राह्यला या हा राजवाडा तुमच्या स्वागताला आतुर झाला आहे".  
                                                  सौ.उषा.      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: