रविवार, २० नोव्हेंबर, २०११

                                   श्री                                21
                 राजेश्वरीने ती रात्र कशीतरी काढली.बापुची काळजी तिला झोपू देत नव्हती.तो इथेच असता तर बरं झालं असतं.त्याचे पाय चेपून देणे,औषध देणे सगळेच सोपे झाले असते.सकाळी ती सगळ्यांच्या आधी उठून अंघोळ वगैरे करून तयार झाली.आज सुजयराजे स्वतः येऊन त्यांना तो महाल दाखवणार होते.बाकीची मंडळी पण सुचेल ते काम करू लागली.प्रत्येकालाच सुजयराजांवर आपली छाप पडावी असं वाटत होतं.कालच्या घटनेनी सगळ्यांनाच आशा वाटू लागली होती.राजेश्वरीच्या उद्धटपणाबद्दल तिला सुजयराजांनी कुठलीच शिक्षा केली नव्हती उलट जास्त जवाबदारीचे काम सोपवून तिचा गौरवच केला होता ह्याचे सगळ्यांनाच नवल वाटत होते.
                      राजेश्वरी पायऱ्या चढून थेट सौधावर उभी होती.सुजयराजे आल्या शिवाय तिला कामाची दिशा ठरवता येत नव्हती.इतक्या उंचावरून सभोवतालचे रमणीय वातावरण तिच्यातल्या कलाकाराला आनंदित करीत होते.सगळीकडे हिरवा रंग दाटून राह्यला होता.क्षितिजावर हिरव्या निळ्या रंगाची गुंफण फारच मनोहारी होती.दूरवर दिसणारे नदीचे क्षीण पात्र उन्हात छान चमकत होते.खालचा माणसांचा आवाज पण वर येईतो अगदी कुजबुज केल्यासारखा येत होता.ही शांतता राजेश्वरीची बाल मैत्रीण होती.ह्या शांततेचा भंग केला तो एका गंभीर आवाजाने.सुजयराजे केव्हा आले हे पण तिला कळले नाही इतकी ती विचारात गढून गेली होती.ही जागा आहेच तशी कुणालाही आवडावी अशीच,तुम्ही इथे असल्याचे कळले म्हणून मी इथे आलो,सुजयराजांच्या शब्दांनी राजेश्वरी अगदी संकोचून गेली,ती हळू आवाजात म्हणाली कुणालाही पाठवून बोलावले असते तरी चालले असते आपण स्वतः कशाला कष्ट घेतले, सुजयराजे यावर फक्त हसले अन तिला खाली चलण्याची खूण केली.
                         राजेश्वरी अन रघुनाथ फक्त दोघांनाच बरोबर घेऊन राजे झपाट्याने निघाले.एका महाला जवळ आल्यावर ते थांबले,इकडे तिकडे बघून त्यांनी झटकन आत प्रवेश केला.रघुनाथ अन राजेश्वरी पण आत शिरले.सगळीकडे धुळीचे साम्राज्य होते,पण सुजयराजे फुलांच्या पायघड्या घातल्या सारखे चालत होते,तंद्रीत असल्यासारखे.या खोलीत पण एक आरसा होता,अर्थातच धुळीने माखलेला!राजांनी तो आरसा अलगद खाली काढून ठेवला.दोघांकडे वळून म्हणाले तुमचे काम या महालात करायचे आहे.भिंतीवर कुठला रंग ,कुठले चित्र याचे तुम्हा दोघांना पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे फक्त आजपासून एक महिन्याच्या आत काम झाले पाहिजे आणी हा जो आरसा मी खाली काढून ठेवला आहे तो इथल्या भिंतीवर पुन्हा लागला पाहिजे.जितक्या झपाट्याने राजे आले तितक्याच झपाट्याने ते निघूनही गेले.रघुनाथ राजेश्वरीला घेऊन तिथून बाहेर पडला.आज काही करून आपली खोली पुन्हा मिळवली पाहिजे म्हणजे राजेश्वरीशी निवांत बोलता येईल.
                                      सौ.उषा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: