श्री ३७
राजेश्वरी आता अंधाराला सरावली होती,अर्थात पुढे जाण्या वाचून तिच्याकडे दुसरा काही पर्याय शिल्लक नव्हता पण मुळात स्वभाव धीट असल्यामुळे कुठल्याही कठीण प्रसंगात तिचे सर्व बुद्धी चातुर्य पणाला लागत असे. अचानक राजेश्वरीला गार वाऱ्याची झुळूक आल्या सारखे वाटले म्हणजे जवळ बहुदा पाणी असावे.नदी,तलाव काहीच कल्पना नाही,पण आता आणखीच जपून चालायला हवे,राजेश्वरीने स्वतःलाच बजावले.तिचा अंदाज अगदी बरोबर होता.थोड्याच वेळात ती एका सुंदर जलाशया जवळ येऊन पोचली.त्यातले नितळ पाणी,सभोवतीचे तितकेच आकर्षक वातावरण या सगळ्याचाच थकलेल्या राजेश्वरीवर विलक्षण प्रभाव पडला.पहाटेच्या सूर्य किरणांनी हलकेच पदन्यास सुरु केला होता.सगळे वातावरण एका दैवी आनंदात मश्गुल झाल्यासारखे होते.जलाशयाच्या जवळ एक बाग दिसत होती.राजेश्वरीने पहिले त्या पाण्यात हात धुवून ओंजळीने पाणी पिऊन घेतले,पाणी प्यायल्यावर तिला खरोखर खूप बरे वाटले.आता तिने बागेकडे आपला मोर्चा वळवला.बागेत खूप विविध प्रकारची फुलं होती. कर्दळी,कण्हेर, गुलाब मोगरा,जाई-जुई, चमेली,कुंद,केवडा, कृष्णकमळ, शेवंती,झेंडू आणी असंख्य फुल झाडं त्या बागेत मोठ्या दिमाखात उभी होती.ही बाग जर सुजय राजांची असेल तर त्यांना जाब विचारायला हवा.आम्ही बापलेक जंगलात फुलांच्या साठी दिवसचे दिवस भटकत होतो,जरी जंगलात मुबलक फुलं असली तरी इथे साक्षात फुलबाग असताना आम्ही तंगडतोड करण्याची कुठलीच गरज नव्हती.पोटातल्या भुकेनी राजेश्वरीला विचारचक्रातून बाहेर काढले.काहीतरी खाल्ले नाही तर आता नक्कीच चक्कर येऊन खाली पडू असे राजेश्वरीला वाटू लागले.बागेत एक पण फळझाड नव्हते,राजेश्वरीला बापूने शिकविलेले ज्ञान अश्यावेळेस कामास येई.तिने पटकन तुळशीची,कडूलिंबाची पाने,गुलाबाच्या,शेवंतीच्या पाकळ्या,अन कोवळ्या दुर्वा तोडून खायला सुरवात केली.एकीकडे डोक्यात विचार सुरु होते.बापू बिचारा आपली वाट पहात असेल.काय सांगितले असेल त्याने आपल्या न येण्याचे कारण ?आता विचार करून काहीच उपयोग नाही इथून कसेही करून राजमहालात परतायला हवे.ही बाग कितीही चांगली असली तरीही इथे फार काळ थांबणे धोक्याचेच आहे.
राजेश्वरी बागेतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असताना तिला लांबवर कुणी माणसं आपसात बोलत येत असताना दिसली,राजेश्वरी पटकन एका दाट झुडुपात दडली.बोलणारी माणसं आता दृष्टीच्या टप्प्यात आली होती.महाराज सुदर्शन,महाराणी सुलक्षणा,अन राजकन्या सुवर्णरेखा,त्यांच्या सेवकांबरोबर बागेत आले होते.त्यांच्या सकाळच्या न्याहारीची व्यवस्था त्यांनी इथेच करायला सांगितले होते.राजेश्वरीच्या आनंदाला पारावर राहिला नाही.म्हणजे आपण कुठल्याच संकटात नाही आपण फक्त सुंदरपुरात येऊन पोचलो आहो.राजपरिवार न्याहारी करत असताना त्या अन्न पदार्थांच्या सुवासाने राजेश्वरीची भूक चांगलीच खवळली होती,पण स्वतःला सावरणे भाग होते अश्या अवस्थेत राजेश्वरी जवळ जवळ दोन तास बसली होती.आणखी फार काळ एक तर तिला बसणं शक्य नव्हतं,अन लपणं त्याहून कठीण! महाराणी सुलक्षणा अन सुवर्णरेखा उठून जाताना दिसल्यावर राजेश्वरी मनाशी काही विचार करून जरा वेळाने महाराज सुदर्शन बसले होते तिथे त्यांच्या पुढे जाऊन उभी राह्यली
सौ.उषा.