मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ५० राजकन्या सुवर्णरेखा राजेश्वरी बरोबर बा...

किल्ल्याचे रहस्य

                                                           श्री                                  ५०
राजकन्या सुवर्णरेखा राजेश्वरी बरोबर बाहेर आली तेव्हा दुपार झाली होती.कालपासून बघितलेल्या अन घडलेल्या घटनांचा तिच्या कोवळ्या मनावर फारच परिणाम झाला होता.त्यातच भुकेनी जीव कासावीस झाला होता.ती आपल्या घोड्याला शोधत होती,घोडा न दिसल्याने राजवाड्यावर कसे जायचे हेच तिला समजत नव्हते.ती सरळ राजेश्वरीच्या खोलीकडे वळली.राजेश्वरी रघुनाथला कालपासून घडलेल्या सर्व गोष्टी सांगत होती.राजकन्येला बघून ती एकदम दाराजवळ आली अन म्हणाली हे काय तू अजून इथेच?कुणाला संशय नको म्हणून मी तुझ्या बरोबर आले नाही बर चल तुझा घोडा कुठे आहे?ह्याच प्रश्नाची वाट बघत असलेली राजकन्या जोरात रडू लागली.माझा घोडा कुठेच दिसत नाही आता मी परत कशी जाणार?मला खूप भूक पण लागली आहे.राजेश्वरी थोडी काळजीत पडली कारण तिच्या दोन्ही प्रश्नांचे तिच्या जवळ काहीच उत्तर नव्हते.रघुनाथ एव्हाना बाहेर आला होता.त्याने सांगितले की मीच घोड्याला तबेल्यात बांधून ठेवले आहे.काल सगळ्यांनीच मला खूप हैराण केले की हा घोडा कुणाचा?सुवर्णरेखा बहुदा कुणाच्या दृष्टीस पडली नसावी.
                   रघुनाथने घोडा आणल्याबरोबर राजकन्या एकदम घोड्यावर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने राजवाड्याकडे निघून गेली.तिच्या येण्याबद्दल कुणाच्या तरी कानावर घालायला हवे होते.हिचे असे वेळी अवेळी एकटीने इकडे येणे बरोबर नाही.रघुनाथ अन राजेश्वरी दोघही हाच विचार करत होते.उद्या संध्याकाळी जाताना रघुनाथला पण बरोबर घेऊन जायचे मान्य केल्यावरच राजेश्वरीला त्याने पुन्हा जायला परवानगी दिली.दोघही बापलेक रात्री जेऊन लवकर झोपले.
               सकाळी घाईने सगळे आटपून दोघही जंगलाकडे निघाले अन किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच त्यांना सुवर्णरेखा भेटली.ती आज आनंदात दिसत होती.तिने आल्या आल्याच सांगितले काल मी न सांगता आली होती पण आज मात्र मी आजी आजोबांना सांगून आले आहे.हे बघा हे माझ्याबरोबर काका आले आहे.तिच्या बरोबर आलेल्या सेवकाने सांगितले की राजकन्या कुठेही गेली तरी मी तिच्या बरोबर असावे म्हणून मी आलो आहे आणी ह्यापुढे त्यांची जिथे जायची इच्छा असेल तिथे मी तिच्या बरोबर जाणार.राजेश्वरीने वरकरणी हसत पण मनातल्या मनात कपाळाला हात लावत दोघांचे स्वागत केले.ह्या दोघांना टाळून कसे जायचे हेच तिला कळेना.सगळे परत खोलीवर आले.बरोबर आलेला सेवक बाहेर थांबला अन तिघही खोलीत गेले.खोलीत गेल्याबरोबर राजकन्या राजेश्वरीला बिलगली आणी तिच्या कानात हळू आवाजात सांगितले मी काल बघितलेले कुणालाच सांगितले नाही.राजेश्वरीने तिला थोपटून शाबासकी दिली.
                 संध्याकाळ झाली तरी राजकन्या जायचं नाव काढत नव्हती.सेवकांनी बरोबर आणलेला खाऊ खाऊन ती राजेश्वरीच्या अवती भवती घोटाळत होती.तिला माहीत होत की राजेश्वरी आता आपल्याला बरोबर नेणार नाही,शेवटी सगळा धीर एकवटून ती राजेश्वरीला म्हणाली "मी माझ्या बापूंची,सुजयराजांची मुलगी आहे.मी आता कुणालाच भीत नाही,त्या बाईला तर नाहीच नाही.तिच्या डोळ्यातली प्रार्थना राजेश्वरीच्या हृदयास भिडली अन ती सुजयराजांना चक्क बापू म्हणाली होती.राजेश्वरीने तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता तिला गमतीने विचारले तू सुजयराजांना बापू म्हणतेस?राजकन्या थोडीशी बावरली पण पटकन म्हणाली तू नाहीका तुझ्या वडलांना बापूच म्हणते तुझ बघून मी पण म्हणणार बापू.तिच्या निरागस चेहेऱ्याकडे राजेश्वरी बघतच राह्यली.राजकन्या परत जायला तयार नाही बघून अखेर राजेश्वरी तिच्या बरोबर राजवाड्यावर जायला तयार झाली.राजकन्या आनंदाने टाळ्या वाजवू लागली.
                                       सौ.उषा.