श्री ३९
राजेश्वरी स्वतःशीच गुणगुणत चालली होती.आता तिला कसलीही भीती वाटत नव्हती वाटेत दिसणारी असंख्य फुलझाडं तिला खुणावत होती.निर्मनुष्य रस्त्यावरून रमत गमत राजेश्वरी चालली होती,घोड्याच्या टापांचा आवाज ऐकून तिने आपले तोंड झाकून चालायला सुरुवात केली,पण तिचा वेश सगळ्या सुंदरपुरला चांगलाच माहीत झाला होता त्यामुळे तिने जरी तोंड झाकले असले तरी ती स्वतःची ओळख मात्र लपवू शकली नाही.पांढऱ्या रंगाची सुंदर फुलं रस्त्याच्या दुतर्फा लागली होती यांच्या कडे आपले आता पर्यंत लक्ष कसे गेले नाही याचेच राजेश्वरीला आश्चर्य वाटत होत
तिच्या स्वतःच्याच लक्षात आले की या वाटेने आपण आज पहिल्यांदाच जातो आहो.टापांचा आवाज आता अगदी जवळ आल्यासारखे वाटले,लपायला जागा नव्हती,शेवटी खाली मान घालून निघून जायचे ठरवून राजेश्वरीने पावलांना वेग दिला.तिच्या अगदी जवळ घोडा थांबला,माखन घोड्यावरून खाली उतरला.राजेश्वरी तू इथे काय करतेस ?तुला खूप ताप भरला म्हणून मी आताच औषध पण देऊन आलो रघुनाथ जवळ ,त्याच्या प्रश्नांच्या भडीमारातून स्वतःला कसेबसे सावरत राजेश्वरी म्हणाली आता मला बरे वाटते आहे म्हणून मी थोडं मोकळ्या हवेत फिरायला बाहेर पडले.विचित्र आहे अश्या अर्थी मान झटकून माखन पुढे निघून गेला,पण ही पायवाट त्यातूनही आडवाट राजेश्वरीला कशी माहीत झाली ह्याचा त्याला काही केल्या उलगडा होईना,पण त्याला अजून पुष्कळ कामं असल्यामुळे या प्रश्नाच्या खोलात जायला त्याला वेळ नव्हता.
राजेश्वरीला राजमहाल दिसू लागला होता,ही बहुतेक राजवाड्याची मागची बाजू असावी कारण या रस्त्याने ती यापूर्वी आली नव्हती राजमहालात येऊन पोचली तेव्हा दुपार झाली होती. राजेश्वरीने आपल्या खोलीत प्रवेश केला,तिला बघून रघुनाथ एकदम उठून उभा राह्यला,तिला पोटाशी धरून एखाद्या लहान मुला प्रमाणे तो रडत होता.राजेश्वरीलाही रडू येत होते.राजेश्वरीला समोर बसवून रघुनाथने तिला चार गोष्टी सांगितल्या अन आता कुठलेही रहस्य उलगडण्याच्या फंदात राजेश्वरीने पडू नये हे त्याने पुन्हा बजावून सांगितले.उद्या सकाळी कुठलेही कारण न सांगता त्या दोघांनी सुजयराजांच्या मित्रांना चित्रकला दाखवून दुपारी किंवा जास्तच जास्त संध्याकाळी इथून निघून जायचे असे ठरल्यावर रघुनाथने राजेश्वरी समोर त्याचे सकाळचे जेवणाचे ताट ठेवले,राजेश्वरी प्रमाणेच रघुनाथ पण उपाशी होता.त्याच ताटात दोघही बापलेक जेवले.अन जेवण झाल्यावर राजेश्वरी लगेच झोपून गेली.
सौ.उषा.