सोमवार, २ जानेवारी, २०१२

                              ||  श्री  ||                       ४५

    
रघुनाथ अन राजेश्वरी राजपरिवाराचा निरोप घेऊन बाहेर पडले खरे पण डोक्यात अनेक विचारांचे काहूर माजले होते.दोघांनीही एकमताने जंगलाचा रस्ता धरला,तिथल्या एकांतातच काहीतरी निर्णय घेता येईल.इथे काहीही बोलणे धोक्याचे होते.किल्ल्याच्या दारात आल्यावर राजेश्वरीने एकवार वळून किल्ल्याकडे बघितले.

गेल्या काही महिन्यात किल्य्याचे रूप खरोखर बदलून गेले होते.दुरुस्तीचे काम इतके चांगले होईल अन भोवतीची बाग इतकी शोभिवंत दिसेल असे कुणालाच वाटले नव्हते.रघुनाथ अन राजेश्वरी आतापर्यंत जिथेही गेले त्यांनी तिथले स्वरूप असेच पालटून टाकले होते.सुजयराजांचे सारेच मित्र,अन सारा राजपरिवार किल्य्याच्या ह्या आकर्षक रूपावर बेहद्द खूष होता. 
     किल्ल्याच्या ह्या मागच्या बाजूने आज त्यांना जंगल गाठायचे होते.म्हणजे कुणी बघायला नको आणी शंभर प्रश्न विचारायला नको     राजेश्वरी भरभर चालत निघाली तिला तिच्या आवडत्या तलावाच्या काठावर बसून रघुनाथशी चर्चा करायची होती.इतक्यात तिला कोणीतरी हाक मारल्यासारखे वाटले,म्हणून वळून पाह्यले तर राजकन्या सुवर्णरेखा धावत तिच्याच दिशेनी येत होती.राजेश्वरी तिथेच उभी राह्यली ,धापा टाकत सुवर्णरेखा जवळ येऊन उभी राह्यली होती,धावण्याच्या श्रमामुळे तिचे गोरे गाल लालबुंद दिसत होते आणी घामाच्या धारा दोन्ही हातानी पुसण्याचा तिचा प्रयत्न फारसा यशस्वी होत नव्हता.राजेश्वरीचा हात घट्ट धरून तिने विचारले आम्हाला शिकवाल तुमच्या सारखे चित्र काढायला ?आमचे पिताजी पण खूप छान चित्र काढतात.पण त्यंना कुठे वेळ असतो आमच्या करता?तिचा चेहेरा निरागस होता.नेहेमीची उद्धट सुवर्णरेखा जणू हरवली होती,राजेश्वरीला ह्या आईबाप असून पोरक्या असलेल्या मुलीची एकदम दया आली,तिने हसून सुवर्णरेखेला चित्र काढायला शिकवायचे कबूल केले.सुवर्णरेखा एकदम आनंदून गेली.तिने लगेच पुढचा प्रश्न विचारला मी येऊ तुझ्या बरोबर?ह्या प्रश्नाने मात्र राजेश्वरी चांगलीच गोंधळली.तिला काय उत्तर द्यावे ह्या विचारात असतानाच केशर येताना दिसली.
सौ.उषा.