सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

                                                     श्री                                             १०
कुठून बर सुरु कराव ? हं मुख्य दारा जवळूनच सुरुवात करावी,मारोतीरायाच मंदिर पण आहे तिथे.मंदिर झाडून काढायला पाहिजे पहिले,विचार आल्याबरोबर ती खोलीकडे गेली. केरसुणी,काठी घेऊन मंदिराजवळ आली ,आत वाकून बघितलं मारोतीरायाची छान मूर्ती होती.सगळीकडे जाळे लागले होते ते आधी साफ केले,झाडले नमस्कार केला,मारोतीराया तुला उद्या सकाळी पाणी घालून छान आंघोळ घालीन,किती मळला आहेस तू.देव म्हणून मांडून ठेवतात तर स्वच्छता नको का ठेवायला स्वतःशीच बडबड करत राजेश्वरी झपाट्याने काम करत होती.सूर्य नारायण संध्यादेवी बरोबर निघाले म्हणताना पाखरांची घरट्याकडे परतायची लगबग सुरु झाली.राजेश्वरीने एकदा डोळेभरून आपल्या नव्या कामाकडे बघितले खोलीवर जाऊन कंदील लावायला हवा,बापू यायच्याआत स्वैपाक पण झाला तर मस्त गप्पा मारता येतील,हातातलं सामान संभाळत राजेश्वरीची पावलं भराभर पडत होती.संध्याकाळच्या सोनेरी किरणांनी राजमहालाचा उंच मनोरा नाहून निघाला होता.
                                स्वैपाक झाला तरी अजून रघुनाथ घरी आला नव्हता.किती वाट बघायची?इथे तर बोलायला पण कुणी नाही.कुत्र्याच्या पिल्लाला तिने जवळ ओढले,तू पटपट मोठा हो बऱ,तुला अजून पायऱ्या चढता येत नाही,पण तुझा या क्षणी मला मोठाच आधार वाटतो आहे.तुझ नाव काय रे ठेवायचं?बऱ बापू आला की ठरवू पण माझ्या बरोबर येतोस का थोडं अंगणात तरी जाऊ.बाहेर आल्यावर खरच बरं वाटतंय,रात्री पण त्या आरश्यात दुपार सारखंच दिसत असेल का ?किती मळके ,विटके चित्र होते आपले,पण आपण हे असे गावोगाव फिरणार त्यात रंगाच काम करणारे तेव्हा असेच कपडे घालावे लागतात.आपला चेहरा छान आहे असं सगळेच म्हणतात .आत्ता पाहूया का आरश्यात ?फक्त चेहेऱ्या जवळ कंदील धरायचा .मनात विचार आल्याक्षणी राजेश्वरी कंदील,काठी घेऊन निघाली.कुठेही जाताना काठी घेऊन जायची सवय तिला लहानपणापासूनच लावली होती रघुनाथने.आपल्या खोलीत आरसा नाही हे तिच्या पहिल्यांदाच लक्षात आले.मान झटकून ती तडक निघाली,तिच्या मागे छोटे पिल्लू पण होते .घाई घाईने त्या खोलीत शिरून राजेश्वरीने कंदील वर उचलला अरेच्या इथला आरसा कुठे गेला? दुपारी जितक्या खोल्या बघितल्या त्या सगळ्यांमधे आरसे होते मग आता का दिसत नाही?एव्हड्या मोठ्या जागेत आपण एकटेच आहोत हे राजेश्वरीला प्रकर्षाने जाणवले.राजेश्वरी वेगाने परत फिरली अन धावतच तिने आपली खोली गाठली! 
                                                                            सौ.उषा.
              

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: