गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

                                               श्री                                                १४
       कारंजाचा विचार करता करताच राजेश्वरी केव्हा झोपली ते तिलाही कळलं नाही.सकाळी रघुनाथ घरातून खाऊन लवकर बाहेर पडला.तो गेल्यावर राजेश्वरीने सर्व झाडांना भरपूर पाणी घातलं,पान अन पान कुरवाळून बघितल.प्रत्येक झाडाशी जिवाभावाचा मित्र असावा अश्या गप्पा तिच्या रंगल्या होत्या.कारंजात बहुदा एखादा जिवंत पाण्याचा झरा असावा,कारण राजेश्वरीने कचरा खरवडून काढल्याने पाण्याचा मार्ग मोकळा झाला असावा.जवळच पाणी असल्याने राजेश्वरीचे काम पुष्कळच सोपं झालं होतं.
                  आज वाघ्याला घेऊन राजेश्वरी पुन्हा राजमहालाचा फेर फटका मारायला निघाली.किती छान आहे हा सगळा परिसर!का बरं सोडला असेल इतका छान राजमहाल ?एकदम राजेश्वरीला जाणवलं सुदर्शन महाराजांचा राजवाडा काही राजवाडा वाटत नाही.खोल्या ज्या आपण बघितल्या त्यांना इथल्या एकाही खोलीची सर नाही.इथल्या खोलीतल्या आरश्यावर धूळ जमली आहे पण तरीही तो आरसा दिमाखदार दिसतो आहे.धुळीचा विचार आल्या बरोबर राजेश्वरीला आठवलं त्या खोलीतल्या आरश्यावर अजिबात धूळ नव्हती.कुणाच्या तरी रोजच्या वापरात असल्या सारखा तो आरसा स्वच्छ होता.मनात विचार आल्या बरोबर राजेश्वरीने त्या खोलीकडे मोर्चा वळवला.आरश्यात डोकावण्याचा मोह काही तिला आवरता आला नाही.पुन्हा तेच मातकट कळकट चित्र!आरसा बिचारा काय करणार जे त्याच्या समोर धराल त्याचेच चित्र तो दाखवणार.राजेश्वरीने आरश्यात बघणे सोडून त्याच्या चौकटीवर लक्ष केंद्रित केले.अस्सल सागवान लाकडाची,उत्तम कोरीव काम केलेली सुंदर चौकट त्या आरश्याच्या सौंदर्यात भरच घालत होती.त्याच्यावर काढलेली सुंदर नक्षी तिच्यातल्या जातिवंत कलाकाराला मोहून टाकत होती.राजेश्वरीने हळुवारपणे त्या नक्षीवरून हात फिरवला त्यातले एक उठावदार कमळ तर फारच छान दिसत होते.तिने अंगठ्याचा दाब देत कमळाच्या पाकळ्या मोजायला सुरुवात केली एक दोन तीन चार अन पाचव्या पाकळीला अंगठ्याचा दाब मिळाल्यावर आरसा अलगद बाजूला सरकला.राजेश्वरी पण दचकून मागे सरली ,आत एक कपाट होते पण त्याला कुलूप लागले होते.राजेश्वरी आपल्या खोलीवर आली तीच जरा खुशीत!आरश्याचे रहस्य अर्धवट सुटले होते.आज मात्र बापूला ही आरश्याची गम्मत नक्की दाखवायची हे तिने स्वतःशीच कबूल केले.
                           रघुनाथ संध्याकाळी घरी आला तोच मुळी एक बातमी घेऊन सुंदरपूरचे युवराज राजे सुजय आठ दिवसांनी येत आहेत.आरश्याचे सांगायचे पुन्हा एकदा राहून गेले.
                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: