शनिवार, ३१ डिसेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                   श्री                            ४४ 
 सुजयराजांबरोबर त्यांची लेक राजकन्या सुवर्णरेखा आली होती.महाराज सुदर्शन आणी महाराणी सुलक्षणा पण आज पुष्कळ वर्षानी ह्या राजमहालात आले होते.त्यांच्या पावलांच्या स्पर्शाने तो जुना राजमहाल अगदी फुलून आला होता.जिकडे तिकडे सेवकांची लगबग सुरु होती.रोज पहाटेच उठणारी राजेश्वरी नेमकी आज उशीरा उठली होती.सगळा राजपरिवार त्या दोघांनी काढलेले चित्र बघायला आला होता.महाराज सुदर्शन,महाराणी सुलक्षणा राजमहालात राजेश्वरी अन रघुनाथची वाट बघत होते.हे कळल्यावर रघुनाथ तडक राजमहालाकडे निघाला. राजेश्वरीला सगळं आटपून जायला थोडा उशीरच झाला.
                         राजेश्वरीने काढलेले राधा कृष्णाचे चित्र सगळ्यांना खूप आवडले.राजकन्या सुवर्णरेखा तर टाळ्या वाजवत म्हणाली ह्यातला कृष्ण अगदी सुजयराजांसारखा दिसतो आहे.पहिल्यांदाच रघुनाथला पण हे जाणवले आणी राजेश्वरी ती अगदी लाजून चूर झाली होती.सुजयराजे मिस्कील हसत होते,ते आज खरच खूप आनंदात होते एक तर त्यांचे आईवडील खूप वर्षानी इथे आले,त्यांची लेक जी कायम त्यांच्यावर रागावलेली असायची ती आज चक्क खुशीत होती,आणी ह्या सगळ्याला कारणीभूत होती ती राजेश्वरी ! तिनी आपली आवड अगदी जगजाहीर करून टाकली होती कालच चित्राद्वारे आपण विचारायच्या कितीतरी आधी!आपली निवड अगदी अचूक आहे हे त्यांना मनापासून पटले.
                       राजेश्वरीला पण आज प्रकर्षाने जाणवले की चित्रातला कृष्ण हुबेहूब सुजयराजांसारखा आहे.सुदर्शन महाराजांनी रघुनाथला विचारले की ते इथून कधी जाणार आहे म्हणजे जायच्या आधी त्यांनी महाराजांना भेटून जावे अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केल्यावर रघुनाथ आश्चर्याने थक्क झाला,एकीकडे सुजयराजे राजेश्वरीला लग्नाची मागणी घालून त्यांना इथे थाबायला सांगतात आणी दुसरीकडे महाराज विचारतात की कधी जाणार!रघुनाथचा गोंधळ सुजयराजांच्या लगेच लक्षात आला,ते झटकन पुढे झाले अन म्हणाले की महाराज मीच ह्या दोघांना इथे थांबण्याचा आग्रह केला आहे.कालच चित्र पूर्ण झालं आहे आता त्यांनी थोडे दिवस इथे विश्रांती घ्यावी अशी माझी इच्छा आहे.महाराजांनी लगेच मान हलवून रुकार दिला.राजेश्वरी पण ह्या प्रकाराने एकदम भानावर आली.म्हणजे ह्यांनी अजून कुणालाच काही सांगितलेले नाही तर.लग्नासारखा निर्णय स्वतःच्या माणसांपासून कसा काय लपवता येईल?ह्याचे रहस्य तातडीने शोधायला हवे हेच खरे.   
नवीन वर्ष सुख समृद्धीचे ,आरोग्याचे ,समाधानाचे जावो  ही मनःपूर्वक शुभेच्छा !सौ.उषा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: