रविवार, ८ जानेवारी, २०१२

किल्ल्याचे रहस्य

                                  श्री 
राजेश्वरीने राजकन्येला म्हटले खरे की उद्या तुला एक गम्मत दाखवीन पण प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी सुजयराजांनी तिला महाराज आणी महाराणीना तिथून परत पाठवले अर्थात त्याला कारणही तसेच होते म्हणा एक तर येणारे दोन तीन दिवस सुजयराजे त्यांच्या मित्राबरोबर  कुठेतरी जाणार होते आणी स्वतः तिथे नसताना त्यांना त्या तिघांच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करायचा नव्हता                  आज काहीकेल्या राजेश्वरीचा दिवस जात नव्हता. संध्याकाळ होत आली तशी तिला एक कल्पना सुचली आणी रघुनाथच्या कानावर घालून ती लगेच निघाली.रघुनाथला आज पण तिने आपल्या बरोबर येऊ दिले नाही.हातात काठी,कमरेला दोरी,राजेश्वरी झपाट्याने सौधाच्या दिशेनी निघाली.त्या विशिष्ट पायरी जवळ येऊन तिने त्या फुलाच्या पाकळ्या फिरवल्या बरोबर पायरी सरकली आणी आत लटकत असलेल्या जाड दोरखंडाला धरून राजेश्वरी आत उतरली,पण कुणीतरी तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली होती.राजेश्वरी चांगलीच घाबरली होती हे काय नवे संकट?अंधारात काही दिसत पण नाही.तिने कमरे भोवतीच्या हातावर हात ठेवला,लहान मुलाचा हात राजेश्वरी एकदम दचकली राजकन्या सुवर्णरेखा तर नाही?तिने हात धरून तिला पुढे ओढले.होय सुवर्णरेखाच होती ती,राजवाड्यातून स्वतःच्या घोड्यावर बसून ती मुद्दाम राजेश्वरीला भेटायला आली होती आणी अनपेक्षितपणे तिला राजेश्वरीचे रहस्यमय वागणे आवडले आणी आपणही तिच्या मोहिमेत सामील व्हावे म्हणून ती चोरपावलाने राजेश्वरीच्या मागे येऊन उभी राह्यली अन राजेश्वरीने पायरी सरकावल्या बरोबर तिने झटकन राजेश्वरीच्या कमरेला मिठी मारली आणी तिच्या बरोबर त्या अंधाऱ्या भुयारात आता ती समोर उभी होती.तिला जरी दिसत नसले तरी राजेश्वरीला आपले येणे आवडले नाही हे तिला समजले होते.आता राजेश्वरीला आल्या प्रसंगाला तोंड देण्याबरोबर राजकन्येची जपणूक करायची होती.तिने खाली वाकून तिच्या कानात सांगितले,इथे काहीही दिसले तरी बोलायचे नाही आपण इथून बाहेर पडे पर्यत दोघींनी एकमेकीजवळ थांबायचे.राजकन्या एकदम आनंदित झाली,हीच ती गम्मत असणार,बर झालं आपण आज आलो ते.दोघींनी आता हात घट्ट धरून पुढे चालायला सुरुवात केली.आता थोडा थोडा उजेड दिसू लागला होता.काही माणसं इकडून तिकडे येजा करताना दिसत होती.समोरचा दरबार दिसू लागला होता पण आज राजेश्वरीला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता.ती योग्य संधीची वाट बघत होती.
                                सौ.उषा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: