श्री ५७
राजेश्वरी लगेच उत्साहाने म्हणाली आपण माझ्यावर विश्वास ठेवा मी आपणास कधीच निराश करणार नाही.त्यांना कुठल्याही कामाची सवय नाही हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे पण काही गोष्टी ते उत्कृष्टपणे करू शकतात आपण त्यांच्याकडून तेच काम करून घेऊ.सुकन्याने मान हलवून होकार दिला.राजेश्वरीच्या बोलण्याला सुकन्या सहज तयार झालेली बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.
आता राजेश्वरी उत्साहाने कामाला लागली.रोजच्या दरबाराच्या वेळेस कसेही करून राजेश्वरीला गुंतवून ठेवणे काही दिवस तरी फार गरजेचे होते.तिने भल्या पहाटे सुकन्याला उठवून बळे बळे भुयारातून बाहेर आणले.सकाळच्या प्रसन्न वाऱ्याने त्या दोघींचे स्वागत केले.सुकन्या डोळे विस्फारून सगळा परिसर अगदी लहान मुलाच्या उत्साहाने बघू लागली.फुलांचे असंख्य प्रकार तिला खुणावत होते.
सुर्योदया पूर्वी सगळा आसमंत एका वेगळ्याच दैवी सुगंध अन प्रकाशाने भरलेला होता.कुणाला काहीच न बोलता बरेच काही समजत होते.सुकन्याचा एरवी चिडका रागीट दिसणारा चेहेरा या क्षणी आनंदित दिसत होता.तिने राजेश्वरीचा हात घट्ट धरून ठेवला जणू काय या क्षणाचा आनंदच ती मुठीत धरून ठेवत होती.राजेश्वरी पण तिच्या या आनंदात सहभागी झाली होती.
दूर क्षितिजावर सूर्यबिंब दिसू लागले आणी राजेश्वरीने सुकन्याला महालात चलण्याची विनंती केली.आज पुष्कळ दिवसांनी सुकन्या अश्या मोकळ्या हवेत सूर्यप्रकाशात आली होती.तिच्या तब्बेतीला ते कितपत मानवेल हे काही सांगता येत नव्हते.सुकन्याची पुन्हा तळघरात महालात जाण्याची अजिबात इच्चा नव्हती.उद्या पुन्हा आपण येऊ जास्त वेळ थांबू असे समजावून तिला कसेबसे परत आणले होते.आल्यावर आज कुठलाही त्रास न देता सुकन्याने वेणी अंघोळ अन खाणे असे सगळेच राजेश्वरीच्या सांगण्याप्रमाणे बिनबोभाट केले.आणी रोजच्या दरबाराची आठवण पण न काढता सुकन्या झोपून गेली.
सौ.उषा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा