सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

                                       श्री                                              17                                    रंगकाम करण्यात राजेश्वरी खूप निष्णात होती असे नाही पण रघुनाथच्या हाताखाली ती चांगली तयार झाली होती.तिचा आत्मविश्वास अव्वल दर्जाचा होता.यशस्वी होण्याकरता जरूरी मेहनत करण्यात ती कुणालाही हार जाणार नव्हती.मुख्य म्हणजे ती स्पष्टवक्ता असूनही विनम्र होती.
                           रघुनाथ,रंगाचं साहित्य यांना नमस्कार करून राजेश्वरीने कामाला मोठ्या उत्साहाने सुरुवात केली.तिच्या हातात फक्त दीड दिवस होता तिच कौशल्य सिद्ध करण्या करता.सगळ्या भिंतींना हलका पिवळा रंग रघुनाथने लावला होता.एक बाजू अर्धवट राह्यली होती ती राजेश्वरीने पूर्ण केली.कुठलं चित्र सुजय राजांना आवडेल? राजेश्वरीचा हात भरभर काम करत होता.भिंतीवर चित्राचा आराखडा तयार करून तिने अभिप्राय विचारण्याकरता रघुनाथकडे पाह्यले तो पुन्हा ग्लानीत होता,तिला थांबायला वेळ नव्हता.सारा दिवस न खाता पिता ती अहोरात्र काम करत होती.चित्र पूर्ण होणे निव्वळ अशक्य होते.पहाटे सुदर्शन महाराज स्वतःच सुजय राजांच्या खोलीत आले,समोरचे चित्र बघून ते थक्क झाले.वा !अर्धवट चित्र इतके सुंदर दिसते आहे तर पूर्ण झाल्यावर किती छान दिसेल !राजेश्वरी पोरी तू खरोखर एक उत्तम कलाकार आहेस.तुला ओळखण्यात आम्ही कमी पडलो हे कबूल करायला आम्हाला जराही संकोच वाटत नाही.चित्राकडे एकटक बघत महाराज एव्हढ बोलून थांबले अन आपल्याच विचारात दंग झाले.राजेश्वरी हात जोडून समोर उभी होती.इतक्यात महाराज एकाएकी आठवण झाल्यासारखे म्हणाले हे चित्र खूप छान आहे पण सुजय राजांच्या खोलीत छे बुवा मी आधीच सांगायला हवे होते.बावरलेल्या राजेश्वरीला गोंधळात ठेवून ते माघारी वळून निघून पण गेले.चित्राचं काय करायचं तेच तिला कळेना.डोळ्यावर झोपेचा अंमल चढू देण्यापूर्वीच तिने स्वच्छ गार पाण्याचा हबकारा तोंडावर, डोळ्यावर मारला.थोड्यावेळ विचार करून तिने पुन्हा चित्र पूर्ण करण्याचा निश्चय केला.
                      राजेश्वरी कितीवेळ चित्रात गुंतली होती हे तिलाच कळल नाही.ती भानावर आली तीच मुळी वा !अप्रतिम !अति सुंदर !या शब्दांनी.महालाच्या दारातून आत येत एक अत्यंत देखणा तरुण तिच्या चित्राची मुक्त कंठाने तारीफ करत होता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: