मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११

                                                    श्री                                     २4
                              रात्रभर राजेश्वरी झोपू शकली नाही.काही न  सांगताही तिच्या मनातली खळबळ रघुनाथने अचूक ओळखली.तिच्या डोक्यावर थोपटून तिला झोपवायचा त्याने प्रयत्न पण करून पाह्यला.तिच्या डोळ्यातले अश्रू पण त्याला दिसत होते.राजेश्वरीच्या हळव्या मनावर अचानक मोठा आघात झाला होता.आई नसल्याचे दुक्ख तिला चांगलेच माहीत होते.लहानग्या सुवर्णरेखेचा निरागस चेहरा तिच्या डोळ्या पुढून हलत नव्हता.तिच्या आक्रस्ताळ्या विचित्र स्वभावाचे हे खरे कारण होते.सुजय राजांबद्दल अतोनात घृणा तिला वाटू लागली.हे काम सोडून निघून जावे असेही आता तिला वाटू लागले. 
                            रघुनाथने सकाळी राजेश्वरीला उठवले तेव्हा सूर्य चांगलाच वर आला होता,पण अजूनही तिला उठून कामाला लागावे असे वाटत नव्हते.बळजबरीनेच रघुनाथ तिला जंगलात घेऊन गेला.इथे थोडे निवांत बोलता येणार होते.राजेश्वरीची प्रतिक्रिया रघुनाथला पण थोडी अनपेक्षित होती.आजवर इतक्या ठिकाणी काम केले पण ती कुठेही गुंतून पडली नव्हती.आपण बरे आपले काम बरे असाच तिचा स्वभाव होता मग आजच काय झाले?
                                 आजच काय झाले या प्रश्नाशी राजेश्वरी रात्रभर झगडत होती.फक्त सुवर्णरेखेच्या दुक्खाने उमटलेली प्रतिक्रिया ही नक्कीच नव्हती.स्वतःशी कबूल करायला धजत नव्हती राजेश्वरी पण हे तिचे पहिले प्रेम होते का?राजेश्वरीला आता स्वतःचा पण तिटकारा वाटायला लागला.कोण कुठला सुजयराजा अन त्याने आपले अवघे भावविश्व व्यापून टाकावे ?काय करू मी देवा कुठे जाऊ?स्वतःचे आरश्यातले प्रतिबिंब तिला आठवले शी! कळकट,घाणेरडे काही बरोबरी तरी आहे का आपली अन सुजयराजांची ? त्यांचा विचार झटकून टाकावा हेच आपल्या हिताचे आहे. आपल्याला काय करायचे आहे?करेना का तो खून त्याच्या बायकोचा,मुलीचा,आपण बरे आपले काम बरे.बापू म्हणतो तेच खरे या मोठ्यांच्या छोट्या गोष्टी आहेत ज्यात आपण लक्ष न घालणेच हिताचे ठरेल.  
                                 सौ.उषा.                   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: