श्री 8
धापा टाकत राजेश्वरी त्या पाहुण्याकडे पाहू लागली.एक छोटंसं कुत्र्याचे पिल्लू,काळभोर ,तपकिरी डोळ्यांचे अन इवल्याश्या नाकाचं.राजेश्वरीने त्याला उचलून पुन्हा पळायला सुरुवात केली.गाडी घेऊन आत येत असलेल्या रघुनाथला पाहून ती जागीच थांबली.काय नवीन मित्र पण मिळाला वाटतं,रघुनाथच्या प्रश्नावर ती मनमोकळं हसली.माझ्या आधी नवीन जागा बघून आलीस की काय ?रघुनाथच्या या प्रश्नावर राजेश्वरीने जोरात नाही म्हणून मान हलवली.रघुनाथ तिला सामाना जवळ उभं करून राजवाड्याच्या दिशेनी झपझप निघाला.बकुळीचा पार ओलांडून त्याने राजवाड्यात प्रवेश केला.अतिशय सुंदर वास्तू पण तितकीच उदास सगळीकडे पाला पाचोळा,धूळ,अन उघड्या बोडक्या खोल्या !जास्त विचार करायला वेळ नव्हता त्याने तिथेच उभं राहून दोन खोल्या सामान अन राहण्याच्या दृष्टीने पक्क्या केल्या.रघुनाथ अन राजेश्वरीने सगळे सामान एव्हाना त्या खोल्यांमध्ये रचून ठेवले होते.राजेश्वरीने सामानातली केरसुणी काढून दोन्ही खोल्या झाडून काढल्या ,रघुनाथने एका भिंतीवर गणपतीचं चित्र काढलं,दोघांनी नमस्कार केला.राजेश्वरीने तीन दगड मांडून चूल तयार केली,जवळचा पाचोळा अन झाडांच्या फांद्या तोडून सरपण तयार केले.दोघांचा स्वैपाक केला अन जेवणार तोच दाराशी आवाज आला.कुत्र्याचे पिल्लू दारात हजर,रघुनाथने संमती देताच तिने त्याला आत घेतलं,पोळीचे तुकडे त्याने भराभर खाल्ले बहुदा ते पण ह्यांच्या सारखेच उपाशी असावे.राजेश्वरीने ठरवलं उद्या त्याच्या करता एक पोळी सकाळ संध्याकाळ जास्त करावी हेच बरं.सामान आवरायचं उद्यावर ढकलून राजेश्वरीने मोठी सतरंजी काढून अंथरली दोन जाड चादरी पण पांघरायला घेतल्या एव्हाना रघुनाथने बैलगाडी सोडून बैलांना झाडाला बांधून ठेवलं.बैलांच्या खाण्या पिण्याची काहीच व्यवस्था नव्हती. कायम पायीच फिरायचं असल्याने दोघानांही हे लक्षात आले नव्हते.राजेश्वरीला संकोचल्या सारखे झाले.काय हे मुकी जनावरं बिचारी कुणाला सांगायची नाहीत पण आपल्या लक्षात राह्यला हवं होतं,ती उठली बैलांजवळ आली दोघांच्याही पाठीवर गळ्यावर तोंडावर हात फिरवून त्यांची माफी मागितली अन उद्या सकाळी त्यांना भरपूर खायला द्यायचे वचन दिल्यावरच तिला रात्री शांत झोप लागली.सकाळी जाग आली,पण नेहेमीपेक्षा उशीरच झाला होता.राजेश्वरीचा स्वैपाक झाल्यावर दोघही हातात काठी अन एक टोपली घेऊन अन आठवणीने बैलांना घेऊन निघाले.दोन तीन दिवस आता त्यांना सारं जंगल फुलांकारता पिंजून काढायचं होतं.रंग मनासारखे तयार व्हायला हवे.बैलांनी पण पोटभर चारा खाला,एव्हाना दोघं बापलेक टोपलीत फुलं,पानं अन भरपूर सरपण गोळा करून घेऊन आले होते.जंगलातल्या विविध वनस्पती पाहून रघुनाथ अगदी हरखून गेला होता,गेल्या कित्येक वर्षात त्याला इतकं सुंदर अन घनदाट जंगल बघायला मिळाल नव्हतं.
सौ.उषा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा