गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

                                               श्री                                             १८
          सुजयराजे इतक्या झपाट्यानी आपल्या महालाकडे आले की सुदर्शन महाराज त्यांना काही सांगूच शकले नाही.युवराजांची आनंदी मुद्रा पाहून महाराजांचा जीव भांड्यात पडला.आता महालात चांगलीच गर्दी झाली होती.सगळे राजेश्वरीच्या चित्राची खूपच तारीफ करत होते.रघुनाथला पण हे ऐकून आनंद झाला.
                           राजेश्वरीची अवस्था मोठी विचित्र झाली होती.ती इतक्या दिवस रघुनाथ सारख्या कलाकाराची मदतनीस होती,तिच्या कानांना आपल्या वडलांचे कौतुक ऐकायची लहानपणापासून सवय होती,पण आज इतका सगळा समुदाय फक्त तिचे कौतुक करत होता.
                          शिडीवरून खाली उतरून तिने महाराज आणी युवराज दोघांना नमस्कार केला.युवराजानी तिला आपल्या कंठातला मोत्याचा हार बक्षीस देऊ केला,इथे पुन्हा सगळ्यांना राजेश्वरीचे वेगळेपण उठून दिसले कारण राजेश्वरीने नम्र शब्दात हार स्वीकारायला नकार दिला.ती म्हणाली की आमचे असे भटके जीवन आहे की त्यात या वस्तूंचा आम्हाला उपयोग होण्यापेक्षा उपद्रव होण्याचीच शक्यता जास्त आहे.मी कधीही महागडे कपडे आणी दागिने घातले नसल्याने त्यांची देखभाल करण्याची सुद्धा मला सवय नाही तरी मला या बाबतीत कुणीही आग्रह करू नये.सुजय राजांनी तिला ताबडतोब काम थांबवण्याचा हुकुम सोडला.
                               दुपारी स्नान जेवण आटोपल्यावर राजेश्वरीला सुदर्शन महाराजांच्या महालात येण्याची आज्ञा मिळाली.रघुनाथ पण राजेश्वरी बरोबर महाराजांच्या महालात आला होता.त्याने महाराजांची परवानगी घेऊन एका खांबा जवळ बैठक मारली.महाराज सुदर्शन महाराणी सुलक्षणा आणी सुजयराजे समोर बसले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: