शनिवार, १९ नोव्हेंबर, २०११

                                                श्री                                             २०
                सुदर्शन महाराजांनी त्यांच्या दिवाणाला ह्या कामा करता शेजारच्या गावा मधून माणसांना आणायला सांगितले.एव्हाना सगळ्या सुंदरपुरात ही बातमी पसरली.जुन्या राजमहालाच्या कामाकरता जायला कित्येक लोक स्वतःच तयार झाले आणी काहीनी त्यांची इच्छा दिवाणजीना समक्ष बोलूनही दाखविली.सुंदरपुरात हे परिवर्तन काही एकाएकी घडून आले नव्हते.गेले कित्येक दिवस रघुनाथ अन राजेश्वरी जुन्या राजमहालात रहात होते.त्यांच्या निर्भय वृतीचा प्रभाव सगळ्यांवरच पडला होता.स्वतःच्या   भित्रेपणाची त्यांना मनोमन लाज वाटत होती.ह्या निमित्ताने त्यांना राजमहालात काम करणे नक्कीच आवडणार होते.
                       रघुनाथ अन राजेश्वरी त्यांच्या करता असलेल्या बैलगाडीत बसून जुन्या राजमहालाकडे निघाले फरक फक्त इतकाच की या वेळेस त्यांच्या बरोबर पुष्कळ माणस होती.गावाची सीमा ओलांडून जंगलाचा भाग सुरु झाला होता.इथे अतिशय दाट झाडी होती.हिरव्या रंगाच्या असंख्य छटा मनास भुरळ पाडत होत्या.त्या हिरव्या मखमलीवर विसावलेली अगणित सुंदर फुलं अन त्यावर बागडणारी फुलपाखर सारच कसं स्वर्गीय होतं!वर निळ्या आकाशात पांढऱ्या ढगांनी वेगळीच रांगोळी काढली होती.
                    तो पहा राजमहाल दिसू लागला.राजेश्वरीला जुना मित्र भेटावा तसा आनंद झाला.किल्ल्यातून आत प्रवेश करताना मात्र राजेश्वरीला राहवले नाही,बैलगाडीतून सरळ उडी मारून ती धावत निघाली.तिची चाहूल लागून कुठूनसा वाघ्या पण आला.राजेश्वरीच्या अंगावर पुढचे दोन्ही पाय ठेऊन शेपटी हलवून तो त्याचा आनंद व्यक्त करत होता.प्राण्यांचं एक बर असतं त्यांची तक्रार नसते,निव्वळ प्रेम असतं अपेक्षारहित ! 
                       रघुनाथ अन राजेश्वरीची खोली ठरलीच होती,बरोबर आलेल्या मंडळींची व्यवस्था करायला वाड्यावरचा सेवक आला होता.शक्यतो सगळ्यांच्या राहण्याची सोय जवळ जवळ असावी असे ठरले त्यात काही बायका पण होत्या.सूर्य क्षितिजावर टेकलेला बघून त्यांचं उसन अवसान गळून पडलं राजेश्वरीच्या खोलीतच राहण्याचा,निजण्याचा त्यानी पक्का निश्चय केला,अन लगेच अमलात पण आणला.रघुनाथ बिचारा आपलं सामान उचलून खोली बाहेर पडला.
                                            सौ.उषा.
                                           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: