मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०११

                                                    श्री                                                २३
                           पहाटे लवकर उठून दोघही बापलेक जंगलाकडे निघाले.हातात टोपली काठी अशी नेहेमीच  सामान होत.रानात मुबलक फुलं मिळाल्याने दोघही खूष होते.रमत गमत चालणे फारसे सोयीचे नव्हते हे लक्षात येऊन दोघं झपाझप चालू लागले.
                            किल्य्याच्या डागडूजीचे  काम सुरु झाले होते त्याचा गलका दूरवर रघुनाथ अन राजेश्वरीला ऐकू येत होता.तिथल्या शांत वातावरणात हा आवाज जरा जास्तच मोठा वाटत होता.डोक्यावर भली मोठी टोपली अन हातात काठी अश्या अवतारातल्या राजेश्वरीकडे लक्ष जाताच सगळीच माणस तिच्याकडे पाहू लागली.राजेश्वरी आपल्याच तालात पुढे निघून गेली.जास्वंद,झेंडू,गोकर्ण,कृष्णकमळ,कुंद,शेवंती अश्या सगळ्याच फुलांचा संमिश्र सुवास आसमंतात पसरला होता.खोलीत पण रंगाचा उग्र दर्प होता.त्या दोघांनाही या वासाची सवय होती पण बाकीच्या माणसांना मात्र हा सगळा वास त्रासदायक वाटत होता आणी त्याच बरोबर रघुनाथ अन राजेश्वरीचा इतक्या दूर राहण्याचा निर्णय किती बरोबर होता हेही पटत होते.
                         दुपारी स्वैपाक होईपर्यंत दोघांचेही काम सुरूच होते.महालातल्या सगळ्या भिंती खरवडून एकसारख्या करण्याचे काम तीन चार दिवस तरी पुरणार होते,राजेश्वरीने स्वतःच ते काम करायला घेतले,तिचा हात भरभर चालत होता.रघुनाथने मोठ्या रांजणात निळा रंग तयार करून ठेवला होता.कुठले चित्र काढायचे ते अजून काहीच ठरले नव्हते.बाहेर बराच आवाज ऐकायला आला म्हणून रघुनाथ बाहेर डोकावला तर सुजयराजे अन राजकन्या सुवर्णरेखा महालाच्या दिशेने येताना दिसले.त्याने हळू आवाजात राजेश्वरीला सूचना दिली.सुवर्णरेखा  खूप दिवसांनी या महालात आली होती ती सगळीकडे काहीतरी शोधत होती.एकाएकी ती राजेश्वरी जवळ येऊन उभी राह्यली.राजेश्वरीचा मळका झगा घट्ट धरून ती जोरात ओरडली "तुला माहीत नाही पण मला माहीत आहे या माणसाने माझ्या आईला मारून टाकले सुजय राजांकडे ती रागारागाने पाहत होती.सुजयराजे हतबल होऊन तिच्याकडे पाहत होते.पाहता पाहता सुवर्णरेखा हमसून हमसून रडू लागली.रडता रडताच ती म्हणत होती या माणसाने माझ्या आईला मारले मला हा माणूस अजिबात आवडत नाही.राजेश्वरी नकळत राजकन्येला थोपटू लागली.तिच्या स्पर्शातल्या प्रेमाने राजकन्या तिला बिलगून आणखीच जोरात रडू लागली.एक तीक्ष्ण नजर सुजयराजांवर टाकून ती राजकन्येला घेऊन बाहेर पडली.थोड्यावेळाने राजकन्येला घेऊन सुजयराजे तर निघून गेले पण राजेश्वरीच्या मनात विचारांचा धुरळा उडवून !लहान मुलं खोटं बोलत नाही अन प्रत्यक्ष बापाबद्दल कोण कशाला बोलेल खोटं.एका देखण्या चेहेऱ्याच्या मागे असे कुरूप मन आहे म्हणायचे.सुजयराजांबद्दल विचार करकरून राजेश्वरीचे डोके दुखायला लागले.झोप येत नव्हती अन आपण एव्हढा विचार का करतो आहे हे पण कळत नव्हतं.
                                                               सौ.उषा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: