सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                                    श्री                                              २७
                            राजेश्वरी आता पुन्हा एकदा मनापासून काम करते आहे हे बघून रघुनाथ पण आनंदात होता.कुठले चित्र काढणार हा प्रश्न त्याने विचारण्याच्याआत राजेश्वरीच म्हणाली बापू आता दोन तीन दिवस इकडे कुणी फिरकायचं नाही अगदी तू सुद्धा तरच मी चित्र काढते.रघुनाथ मनातल्या मनात कपाळाला हात लावत बाहेर पडला.या आई वेगळ्या मनस्वी मुलीला वाढवताना त्याला फार कष्ट पडले होते.राजेश्वरीला खात्री होती कुणी येणार नाही पण सुजयराजांना कोण अडवणार ?या महालाचे मोठ्ठे दार लावणे म्हणजे काही गम्मत नाही,तिने सरळ रघुनाथलाच दारात बसून राहण्याचा हुकुम सोडला.रघुनाथ बिचारा दारात पहारा देत बसला.त्याला एकीकडे बरेही वाटत होते.राजेश्वरीच्याच परवानगीने राजेश्वरीवर नजर ठेवता येत होती.
                          राजेश्वरी अगदी तल्लीन होऊन चित्र काढत होती.सुजयराजे दोन तीन दिवस लागोपाठ येऊन गेले पण त्यांना चित्र बघण्याची परवानगी नव्हती.राजेश्वरीने आता रात्री पण तिथेच राहण्याचा निश्चय केला.चित्राच्या बाबतीत तिला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता,चित्र जवळ जवळ पूर्ण होत आले होते.शेवटचा हात उद्या फिरवू म्हणजे फक्त एक भिंत राह्यली ते काम बापूच्या  मदतीने करणार होती.
                       तिन्हीसांजा झाल्याने नीट दिसत नव्हते म्हंणून काम थांबवून राजेश्वरी तिच्या आवडत्या ठिकाणाकडे म्हणजेच सौधाच्या दिशेनी जाऊ लागली,रघुनाथने तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण मग तिला लवकर अंधाराच्या आत खोलीत ये असे सांगून तो खोलीकडे निघून गेला.एक एक पायरी चढताना राजेश्वरीला त्या दिवसाची आठवण येऊ लागली ती स्त्री इथेच येऊन नाहीशी झाली होती.तिने प्रत्येक पायरी बघायला सुरुवात केली.प्रत्येक पायरीवर स्वस्तिक काढले होते फक्त एकाच पायरीवर कमळ होते.तिने कमळाच्या प्रत्येक पाकळीला हलवून पाह्यले.छे.काहीच नाही .पण ती स्त्री तर इथेच येऊन नाहीशी झाली होती.राजेश्वरीने आठवून बघितले ती खाली बसली होती,बरोबर! राजेश्वरीने पुन्हा पहिल्या पायरीपासून सुरवात केली.प्रत्येक पायरीवर बसून ती आजूबाजूला चाचपून बघत होती.एका ठिकाणी पायरीजवळ पण भिंतीत असलेल्या उठावदार कमळाकडे तिचे लक्ष गेले,तिने असे कमळ पूर्वी बघितले होते.तिने कमळाची पाकळी हलवायला सुरुवात केली.एक दोन तीन चार अन पाच,राजेश्वरीच्या पायाखालची पायरी सरकली अन काही कळायच्या आत ती  एका अंधाऱ्या जागेत पडली,जरी धीट असली तरी या अनपेक्षित प्रकाराने राजेश्वरी पुरतीच घाबरली.सगळीकडे अगदी काळोख अन काळोख होता.थोड्यावेळ पडल्या जागीच बसून राह्यल्यावर राजेश्वरी उठून उभी राह्यली कुठवर चालत जावे लागणार आहे माहित नाही अन पुढे कुठले संकट आहे तेही माहीत नाही.कधी नव्हे ते राजेश्वरीचे डोळे भरून वाहू लागले.मला माझ्या बापूकडे जायचे आहे पण कसे?
                                    सौ.उषा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: