बुधवार, ३० नोव्हेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                                  श्री                                             २९
                    संध्याकाळी दिवेलागणीला राजेश्वरी उठून बसली पण आपल्याच मनाशी विचार करत होती,खोलीतून बाहेर यावेसे वाटत नव्हते.सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा न बोलून बरच काही बोलत होत्या त्यापेक्षा इथेच बरे,पण आपण काही गुन्हा केला आहे का?त्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नाला खरे उत्तर ध्यावे का?नाही नकोच उगीच फालतू चर्चा! राजेश्वरीने सगळ्यांना आवडेल असे उत्तर द्यायचे ठरवले.
                  रात्री जेवायच्या ठिकाणी ती स्वतःच गेली अन तिने रघुनाथला उद्देशून पण सगळ्यांना ऐकायला जाईल अश्याप्रकारे सांगायला सुरुवात केली"तुम्हा सगळ्यांनाच उत्सुकता असेल की मी रात्रभर कुठे होते,मी संध्याकाळी काम आटोपून सौधावर उभी होते.अगदी अंधारून आले म्हणून मी खाली उतरून तिथल्याच एका खोलीत कसला तरी आवाज आला म्हणून डोकावले अन तिथेच चक्कर येऊन पडले.खोलीत अंधार असल्यामुळे कदाचित मी कोणाला दिसले नसेन,सकाळी शुद्धीत आल्यावर मी लगेच आपल्या खोलीवर आले बस एवढेच.सगळ्यांना खात्री होती की हे त्या स्त्रीचेच काम असावे कारण राजेश्वरी सारख्या तरुण मुलीला उगीचच चक्कर कशी येईल  आणी सगळ्यांनी एकमेकाला बजावले की संध्याकाळ व्हायच्या आत सगळे एकत्र दिसले पाहिजे.राजेश्वरीने जोरात मान हलवून रुकार दिला,तिने हळूच रघुनाथकडे बघितले त्याचा चेहेरा निर्विकार होता.
                    पुढचे आठ दिवस सगळ्यांनाच फार धांदलीचे गेले.राजांनी सगळा किल्ला,राजमहाल स्वतःच्या देखरेखीखाली स्वच्छ करून घेतला. किल्ल्यातला राजमहाल आता खरोखर नटला होता.चारीकडे फुलबाग, वेगवेगळ्या  आकाराची कारंजी,इकडून तिकडे उडणारी फुलपाखरं ,अन वस्तीला येऊ बघणारे पक्षी,मुख्य म्हणजे माणसांची वर्दळ यामुळे राजमहाल फारच शोभिवंत दिसू लागला होता.सुजयराजांचे मित्र दोन दिवसांनी इथेच राह्यला येणार होते.मेजवानीचा मोठाच बेत राजांनी आखला होता त्याची जय्यत तयारी सुरु होती.रंगीबेरंगी गालिचे,पडदे हंड्या झुंबर अन आणखी कितीतरी वस्तूंनी राजमहालाच्या सगळ्या खोल्या आकर्षक दिसू लागल्या होत्या.माखन सांगेल त्याप्रमाणे खोल्यांची सजावट केली जात होती.स्वतः सुजयराजे दिवसातून दोन वेळा येऊन कामाची खातरजमा करून घेत होते.त्या महालात राजेश्वरीचे चित्र पूर्ण झाल्यावर सुजयराजांना निरोप दिल्यावर ते लगेच आले.लहान मुलाच्या उत्सुकतेनी त्यांनी चित्र बघून त्याची खूप तारीफ केली,पण राजेश्वरीला का कोण जाणे असं वाटलं की बहुदा त्यांना विशेष आवडले नसावे.एकच भिंत राह्यली होती त्या  भिंतीला फक्त रंग लावून ठेवायला सांगून सुजयराजे निघून गेले.
      

                                               सौ.उषा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: