गुरुवार, २२ डिसेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                                   श्री                        ३8
 राजेश्वरीला अकस्मात आपल्या पुढे बघून महाराज चांगलेच दचकले होते,ही त्यांची खाजगी बाग होती इथे त्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश नव्हता पण राजेश्वरी त्यांच्या पुढ्यात उभी होती. 
             

           

 तिथल्या हिरवळीकडे राजेश्वरी एकाग्र होऊन बघत होती.महाराज तिला विचारत होते की तू इथे कशी काय आलीस त्यावर राजेश्वरीने काहीही न लपवता तिने जे काय बघितले ते सगळे महाराजांना सांगितले. सौधाजवळच्या पायरी पासून ते भुयारातून या बागे पर्यंत असे इथंभूत वर्णन राजेश्वरीने केले.तिच्या धाडसाचे महाराजांना खूप कौतुक वाटले पण तिच्या आगावूपणाचा राग पण आला.राजेश्वरीने त्यांना सांगितले की सर्वसामान्य माणसांना भुताची भीती दाखवून कित्येक लोक त्याचा गैरफायदा घेतात,अश्या लोकांपासून  भोळ्या भाबड्या लोकांना वाचवावे फक्त एव्हढाच हेतू या मागे होता.राज घराण्याच्या कोणत्याही रहस्याचा उलगडा करण्यात तिला किंवा तिच्या बापूला काडीमात्र रस नाही आणी तरीही जर महाराजांना यात काही गैर वाटत असेल तर ते सांगतील ती शिक्षा भोगायला राजेश्वरी आनंदाने तयार आहे,फक्त आज तिला राजमहालात परत जाऊ द्यावे कारण सुजयराजांनी त्यांच्या मित्रांना मुद्दाम रघुनाथ अन राजेश्वरीची चित्रकला दाखविण्याचे कबूल केले आहे.महाराज थोड्या वेळ विचारात पडले,राजेश्वरीवर कितपत विश्वास ठेवावा याचा त्यांना अंदाज येत नव्हता,नाही म्हटले तरी राजेश्वरीला राजघराण्याची नको ती रहस्य कळली होती,महाराज विचारात पडलेले बघून राजेश्वरी पुन्हा म्हणाली की महाराज दोन तीन दिवस राहून आम्ही इथून निघून जाणार आहोत,या दोन तीन दिवसात मी कुणाशीही काही बोलणार नाही,एव्हढेच काय पण मी आयुष्यभर कुणाला काही सांगणार नाही,राजेश्वरीच्या आर्जवी स्वराने महाराज आश्वस्त झाल्यासारखे दिसले.त्यांनी तिला तडक राजमहालाकडे जायला सांगितले.मुख्य रस्त्याने न जाता राजेश्वरीने एका आडवाटेने जाणे पसंत केले,अर्थात ही वाट तिला महाराजांनीच दाखविली होती. त्या वाटेनी राजेश्वरीचा पुन्हा एकदा राजमहालाकडे प्रवास सुरु झाला. पाय दुखत होते अन भूक लागली होती लवकरात लवकर राजमहाल गाठायला हवा.
                           सौ.उषा. 
                       



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: