श्री ५४
किल्ला दुरून दिसू लागला होता.आपले घर दिसल्या सारखा आनंद सगळ्यांना झाला.राजेश्वरी खोलीत आली आणी ती आश्चर्य चकित झाली एकाच दिवसात खोलीचा कायापालट झाला होता.खोलीत दोन पलंग त्यावर गाद्या सुंदर चादरी अन खोलीत पाय रुतेल इतका जाड गालीचा. रघुनाथ पण या बदलाने प्रभावित झाल्याशिवाय राह्यला नाही. त्याला फक्त एकाच काळजीने व्यापले होते की आपण आता झोपायचे कसे? इतक्या जाड गादीवर आजवर तो कधीच झोपला नव्हता. सुवर्णरेखेला मात्र या सगळ्यापेक्षा आपल्याला इथे राह्यला मिळणार अन जमलं तर त्या बाईला पुन्हा भेटायला मिळणार.माझ्या म्हाताऱ्या आजी आजोबांना,माझ्या बापूला फटके मारणाऱ्या, उपाशी ठेवणाऱ्या त्या बाईला काहीतरी जबरदस्त शिक्षा केली पाहिजे या विचारात ती दंग होती.राजेश्वरी फुलांच्या पायघड्यांवर जणू चालत होती.एकाच वेळेस सर्व रंग अवतरले होते .त्या रंगांचे कौतुक राजेश्वरी शिवाय कोण जाणू शकणार!
तिचा जन्मच मुळी रंगांशी खेळण्या करता झाला होता.
किल्ल्यावरची सगळी माणसं काहीतरी निमित्त साधून खोलीत डोकावून गेली होती.राजेश्वरी अन रघुनाथचे एका दिवसात पालटलेले भाग्य सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय होते.त्यात राजकन्येला त्यांच्या बरोबर राह्यची परवानगी हा तर रहस्यमय भाग होता.राजेश्वरीला मनातल्या मनात हसू येत होते.आपल्या अंगावर धड कपडे नाही अन या उंची गालिचे अन चादरीवर आपण वावरायचे छे!ही बहुदा राजकन्ये करता व्यवस्था केली असावी.आपणच रात्री दुसरी खोली गाठावी हेच बरे.तिची विचार शृंखला तुटली ती माखनच्या आवाजाने त्याने हातातले गाठोडे तिच्या स्वाधीन केले अन सांगितले की महाराणी म्हणाल्या की यापुढे हेच कपडे अन अलंकार घालायचे.त्याचे वाक्य जणु पूर्ण करण्या करता आत येत सुजयराजे म्हणाले तसेही तुझे वस्त्र वाघाशी लढताना फाटले,जळले आहे,तेव्हा आता नाही म्हणू नकोस आणी या सगळ्याचा स्वीकार कर. राजेश्वरी फक्त एवढेच म्हणाली की मला जर त्या ठिकाणी नोकर म्हणून जायचे असेल तर मला एवढे भारी कपडे अन अलंकार घालणे सोयीचे नाही.आपण या आधी दिलेले हे थोडे अलंकार मी रोज घालते,मला कपड्यांची आवश्यकता आहे पण ते साधे कपडे,त्यांची कृपया व्यवस्था करावी.आणी हो आपल्याला कसे कळले मी वाघाला पळवले,सुजयराजे हसत म्हणाले,आम्ही तुमच्या मागोमाग इकडे यायला निघालो.आम्ही संध्याकाळी येणार होतो पण मग विचार आला की तुझ्या शोध मोहिमेत मला पण भाग घ्यायला मिळाला तर तेवढाच आनंद मिळेल.
राजेश्वरीच्या योजनेप्रमाणे रात्री सगळ्यांनी वागायचे नक्की झाले.रघुनाथ,सुजयराजे बरोबर येणार म्हणून एकीकडे तिला आनंद झाला होता अन त्याच वेळेस त्यांचे येणे त्यात सुवर्णरेखा बरोबर म्हणजे थोडी काळजी वाटत होती.याच योजनेचा भाग म्हणून सुजयराजे राजकन्येला घेऊन राजमहालात गेले.
सौ.उषा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा